'ईडी'ने दाखवला 'दम'! : प्रवीण राऊतांची ७२ कोटींची मालमत्ता रडारवर

01 Jan 2021 22:48:09

sanjay raut_1  
 
 



नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राऊतांना दणका

मुंबई : बहुचर्चित ‘पीएमसी बँक’ घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवार, दि. १ जानेवारी रोजी मोठी कारवाई केली. ‘ईडी’ने शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांच्या ७२ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर टाच आणली. पीएमसी बँकेतील ४ हजार, ३०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ‘ईडी’मार्फत तपास सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना अटक केली होती.
 
पीएमसी बँकेचे ९० कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत व त्यांची पत्नी माधुरी राऊत यांची चौकशी करण्यात आली आहे व त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. दुसरीकडे या प्रकरणात संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे. प्रवीण राऊत यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात ५५ लाख रुपये ‘ट्रान्सफर’ करण्यात आले होते.
 
यासोबतच तीन कंपन्यांमधील व्यवहारांच्या अनुषंगानेही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ‘ईडी’ने पहिली नोटीस बजावल्यानंतर वर्षा राऊत यांच्याकडून ५ जानेवारीपर्यंत मुदत मागण्यात आली होती. ही मुदत देताना ‘ईडी’ने आता ५ जानेवारी रोजी हजर राहण्यासाठी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे.
Powered By Sangraha 9.0