सायबेरियात सापडले हिमयुगातील 'या' प्राण्याचे अवशेष

01 Jan 2021 18:36:57
rayon _1  H x W

५० हजार वर्षांपूर्वीचे अवशेष


सायबेरिया - सायबेरिया पूर्वेकडील भागामध्ये स्थानिकांना हिमयुगातील व्हूली गेंड्याचे दुर्मीळ अवशेष सापडले आहेत. उत्तर-पूर्व रशियामधील याकुतियाच्या अबीस्की प्रदेशामध्ये वितळणार्‍या बर्फाळ जमिनीत गेंड्याचे अवशेष आढळून आले. हा गेंडा २० ते ५० हजार वर्षांपूर्वीच्या प्लीस्टोसीन युगातील आहे. 
 
 
सायबेरियातील याकुतिया प्रदेशामधील तिरेख्त्याख नदीच्या काठावर ऑगस्ट २०२० मध्ये वितळणाऱ्या बर्फामध्ये व्हूली गेंड्याचे अवशेष आढळून आले. या अवशेषामधील बरेच अवयव अबाधित राहिले आहेत. सध्या या भागात बर्फवृष्टी झाल्याने रस्तेवाहतूक बंद आहे. त्यामुळे रस्तेवाहतूक खुली झाल्यावर गेंड्याच्या अवशेषाला याकुत्स्क शहरातील विस्तृत अभ्यासाकरिता पाठवले जाईल. या अवशेषांची तपासणी करणारे संशोधक वॅलेरी प्लॉट्निकोव्ह यांनी रशियन माध्यमांना सांगितले की, या गेंड्याचा मृत्यू होण्यासमयी त्याचे वय तीन ते चार वर्षांचे होते आणि बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. गेंड्याच्या आतड्यांसह गुप्तांगातील काही त्वचा अजूनही अबाधित असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 
 
'रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस'च्या पॅलेओन्टोलॉजिस्ट प्लॉटनिकोव्ह यांनी सांगितले की, या गेंड्याचे एक लहान शिंगही अबाधित राहिले आहे. हा एक दुर्मीळ योगायोग आहे. कारण सर्वसाधरणपणे गेंड्यांची शिंग ही काही कालावधीतच विघटीत होतात. २०१४ मध्ये याच परिसरात व्हूली गेंड्याचे अवशेष सापडले होते. त्यावेळी संशोधकांनी त्याचे नामकरण शाशा असे केले होते. हे अवशेष साधारण ३४ हजार वर्षांपूर्वीचे होते. अलिकडच्या वर्षांत सायबेरियातील काही भागांमध्ये मॅमथ, व्हूली गेंडा, फॉअल आणि गुहेत राहणाऱ्या सिंहांच्या पिल्लांचे अवशेष सापडले आहेत. रशियाच्या उत्तर आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये ग्लोबल वार्मिंगने गोठलेली जमीन वितळवल्यामुळे या प्रकारचे शोध वारंवार होत आहेत.
Powered By Sangraha 9.0