मुंबईत सर्पमित्रानेच केली वन्यजीवांची चोरी; सर्पमित्रास अटक

09 Sep 2020 19:23:20
forest _1  H x
 

तस्करी होणारे जीव सापडले घरात
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज चेंबूरमधील एका सर्पमित्राच्या घरावर टाकलेल्या धाडीतून काही वन्यप्राणी ताब्यात घेतले. वन विभागाच्या परवानगीशिवाय सर्पमित्राने हे प्राणी स्वत:कडे बाळगले होते. यामध्ये तस्करी होणारी स्टार कासवे, टॅरेनटुला (कोळी) आणि सापाचा समावेश आहे. सर्पमित्रास अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
मुंबईत सर्पमित्राच्या नावाखाली अवैधरित्या वन्यजीवांना बाळगल्याचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. वन विभागाच्या मुंबईतील वनाधिकाऱ्यांनी चेंबूरमधील गव्हाणपाड्यातून आज एका सर्पमित्राला अटक केली. अब्दुल सत्तार खान नामक सर्पमित्राच्या घरावर मारलेल्या धाडीत वनाधिकाऱ्यांना दोन स्टार प्रजातीची कासवे, एक टॅरेनटुला आणि फुरसे जातीचा साप आढळला. या वन्यप्राण्यांना ताब्यात घेऊन खान याच्यावर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव बचावाच्या नावावर खान याने हे प्राणी वन विभागाच्या परवानगीशिवाय आपल्या घरात ठेवले होते. महत्त्वाचे म्हणजे खान याच्या घरात सापडलेल्या या तिन्ही प्रजातीच्या प्राण्यांना वन्यजीव तस्करीमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे यामागे असलेल्या तस्करीच्या संशयाचा तपासही अधिकारी करत आहे. 
 
 
आरोपी खान हा काही वर्षांपूर्वी सर्पमित्र म्हणून आमच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आरोपी आमच्या संपर्कात नसल्याची माहिती मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही खान याच्या घरावर धाड मारल्यानंतर त्याठिकाणी आम्हाला 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत संरक्षित असलेले वन्यजीव विनापरवाना ठेवल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे कोणताही वन्यजीव वन विभागाच्या परवानगी शिवाय बाळगून ठेवणे बेकायदा असल्याने आम्ही आरोपीवर गुन्हा दाखल केल्याचे, कंक यांनी स्पष्ट केले. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कंक, वनक्षेत्रपाल वर्षाराणी खरमाटे, ठाण्याचे वन कर्मचारी आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांच्या सहकार्याने पार पडली.
Powered By Sangraha 9.0