जनता कोरोनाने त्रस्त ; राष्ट्रवादी पक्षप्रवेशात व्यस्त

    दिनांक  09-Sep-2020 18:26:17
|
NCP_1  H x W: 0मुंबई :
राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. हा आकडा दिवसांदिवस वाढतच आहे अशातच राज्यातील आरोग्यविषयक असुविधांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशावेळी या सुविधांवर भर देण्याबाबत राज्यातील महाविकास आघडी मात्र गंभीर नसल्याचे चित्र आहे. एकीकडे सत्तेतील शिवसेना व कंगना रानौत यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे तर दुसरीकडे सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षप्रवेश करून घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेक कलाकार व नेत्यांचे पक्षप्रवेश पार पडले.
 
 
 
विशेष म्हणजे या कार्यक्रमांना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार विजय पाटकर, सविताताई मालपेकर, प्रियदर्शन जाधव, कौस्तुभ सावरकर, संतोष भांगरे, मायाताई जाधव, गिरीश परदेशी, उमेश बोळके, बाळकृष्ण शिंदे, डॉ. सुधीर निकम, श्याम राऊत, मोहित नारायणगावकर यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 
 
तर भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यापूर्वीही विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांनी आरोप केला होता की, राष्ट्रवादीचे नेते, मंत्री कोरोना परिस्थिती पाहण्यासाठी तालुक्यात, जिल्ह्यात येतात मात्र पक्षप्रवेश करून निघून जातात. जनतेत न जाता केवळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतात. त्यामुळे या सरकारला कोरोनाच्या परिस्थितीचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसते. राज्यासमोर सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या, वाढता मृत्युदर, अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा बिघडलेला गाडा यांसारखे गंभीर प्रश्न आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.