राज्य सरकारच्या असंवेदनशील हाताळणीचा हा परिणाम : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2020
Total Views |

Devendra Fadanvis_1 
 
मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर आणलेल्या स्थगितीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकावर टीका करत, “राज्यातील महाविकास आघाडी सरकार सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणावर गंभीर नव्हते. त्याचाच परिणाम आपल्यासमोर आहे.” असे म्हणाले आहेत.
 
 
“मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेल्या कालखंडात या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते. पण, हे सरकार प्रारंभीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नव्हते आणि आज त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
“आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस-रात्र एक करून परिश्रम घेतले. केवळ विधिमंडळात कायदे करून ते टिकविता आले नसते, हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला. आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तेव्हा तेथे प्रयत्नांची शर्थ करून ते आरक्षण टिकविले. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो आहोत.” अशी खंत त्यांनी पुढे व्यक्त केली.
 
 
“राज्य सरकारने दाखविलेल्या बेपर्वाईचा, असंवेदनशील हाताळणीचा हा परिणाम आहे. सुरुवातीपासूनच न्यायालयीन प्रत्येक बाबतीत या सरकारने दुर्लक्ष केले. कधी वकिल हजर झाले नाही, तर कधी वेळेत आवश्यक परिपूर्ती केली गेली नाही. मागासवर्ग आयोग ७ महिन्यांपासून गठीत केलेला नाही. यासाठी आपण पत्रव्यवहार सुद्धा केला. पण, सरकारने त्यालाही दाद दिली नाही.” अशी टीका त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारवर केली आहे.
 
 
“असे असले तरी मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण त्यांच्यासोबत आहोत. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात ते एकटे नाहीत. आम्ही सारे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे.” असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील मराठा तरुणांना दिला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@