अवयवदान हे एक राष्ट्रीय महान कार्य

    दिनांक  09-Sep-2020 19:09:30
|


Organ Donation _1 &n


अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प असून यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे व एक चळवळ उभी राहणे आज काळाची गरज आहे. अवयवदान करण्याची इच्छा असेल तर मी काय काळजी घ्यावी? कुणाला भेटावे? सरकारी दवाखान्यात जावे की खासगी डॉक्टरांना भेटावे ? अवयवदान केल्याने माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? मी जीवंत असताना अवयव दान करू शकतो की मृत्यूनंतर? एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आज संभ्रम निर्माण करत आहेत. कारण, अवयवदानाची चळवळ व जनजागृती हव्या तेवढ्या प्रमाणात आज आपल्या भारत देशामध्ये झालेले नाही.

 


कोरोना महामारी संकटाचा सामना करताना काही माणसे केवळ हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावतात अशा परिस्थितीत त्यांचा देह एकतर जाळला जातो किंवा दफन केला जातो. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेली आहे. ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’, हे वाक्य आपण खूपदा ऐकले आहे. परंतु, त्याप्रमाणे खरंच आपण प्रयत्न करतो का? आपल्या मृत्यूनंतर आपल्याकडून कुणाचे तरी जीवन फुलविण्याचा आपण कधी मनात विचार केला आहे का? ‘देह हे काळाचे धन कुबेराचे’ असे संतांनी म्हटले आहे. मग या देहाचा मेल्यानंतर सदुपयोग व्हावा यासाठी आपण काही केलेत का? आज प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून अवयवदानाचा विचार हा केलाच पाहिजे. होय! आपण हे करू शकतो. एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यामुळे त्याच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव नष्ट होतात. परंतु, मृत झालेल्या व्यक्तीच्या इच्छेवरून अंत्यसंस्कार यापूर्वीच त्या व्यक्तीचे नातेवाईक सहा तासांच्या आत अवयवदान करू शकतात. आपल्या अवयवांचे आपल्या मृत्यूनंतर दान केल्यास आपण गरजूंना एक जीवंत संजीवनी देतो. आपल्या अवयवदानाने कुणाचे तरी जीवन आपण पुन्हा फुलवू शकतो व मेल्यानंतरही हे जग पाहू शकतो. अवयव प्रत्यारोपणाबाबत लोकांच्या मनात मोठी उत्सुकता व भीतीही असते. परंतु, वैद्यकीय क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. आज प्रत्यारोपण प्रक्रिया अतिशय सुलभ व अतिशय काळजीपूर्वक केली जाते. हृदय, किडनी, यकृत, डोळे, फुफ्फुस आदी अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण केल्याचे आपण प्रसारमाध्यमांतून पाहिले व ऐकले आहे. परंतु, ‘मी एक अवयवदाता’ म्हणून कधी आपण विचार केला आहे का? आज आपल्या देशात अनेक गरजू लोकांना अवयव प्राप्तीसाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. आपले जीवन व्यतीत करावे लागत आहे. कुणी अवयव दाता मिळेल, या आशेने ते जगत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण अवयवदान केले पाहिजे. कारण, आज देशाला अवयवदानाची खरी गरज आहे. सामाजिक बांधिलकीतून उमेश खिराडे (गुरूजी) यांनी अवयवदान हे महान राष्ट्रीय कार्य करण्याचे आवाहन केले आहे.


अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प असून यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे व एक चळवळ उभी राहणे आज काळाची गरज आहे. अवयवदान करण्याची इच्छा असेल तर मी काय काळजी घ्यावी? कुणाला भेटावे? सरकारी दवाखान्यात जावे की खासगी डॉक्टरांना भेटावे ? अवयवदान केल्याने माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? मी जीवंत असताना अवयव दान करू शकतो की मृत्यूनंतर? एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आज संभ्रम निर्माण करत आहेत. कारण, अवयवदानाची चळवळ व जनजागृती हव्या तेवढ्या प्रमाणात आज आपल्या भारत देशामध्ये झालेले नाही.


स्वयंसेवी संस्था, जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन यांसाख्या प्रभावी संस्था व शासनामार्फतसुद्धा हे प्रयत्न केले जात आहेत. परंतु, एक जबाबदार नागरिक म्हणून मी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे तरच अवयवदान चळवळ ही व्यापक स्वरूपात सुरू होईल. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ मध्ये अस्तित्वात आला. त्यामुळे सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी मानवी उपचाराकरिता तसेच अवयवांची बेकायदा विक्री करण्यासंदर्भात प्रतिबंध लागले गेले आहेत. अवयवदान म्हणजे काय? कोण अवयवदान करू शकतो ? अवयवदानाचे होणारे चांगले वाईट परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन होणे व त्यांच्यामधील संभ्रमावस्था दूर करणे अत्यावश्यक आहे. .अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते किंवा त्या व्यक्तींचा मेंदू मृत होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील किडनी, हृदय,डोळे, फुफ्फुसे, स्वादुपिंड किंवा त्वचा हे अवयव दान करणे होय.


यामध्ये आपण संपूर्ण शरीरसुद्धा दान करू शकतो, याला ‘देहदान’ असे म्हणतात. एखादी व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगून ठेवते किंवा इच्छा व्यक्त करते की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात दान का तर संपूर्ण देहदान असेल किंवा शरीरातील इतर अवयव असतील. त्यावेळेसच डॉक्टर्स या अवयवांचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करून गरजूला अवयव प्राप्त होतात व त्याचे जीवन पुन्हा खुलते. आपले अवयवदान हे मरणाच्या अवस्थेत असलेल्या माणसाला पुन्हा आयुष्य प्राप्त होते म्हणूनच अवयवदान हे महान देशकार्य आहे.


अपघातात मृत्यू पावलेले व्यक्ती किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू पावलेले माणसे त्यांचे नातेवाईक किंवा स्मृतीभ्रंश होतो अशी माणसे व त्यांचे नातेवाईक अवयवदान किंवा देहदान करू शकतात. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याचे परिणाम, धोके याबाबतची माहिती रुग्णास व नातेवाईकांत डॉक्टरांमार्फत लेखी स्वरूपात दिली जाते. कायद्यानुसार नोंदणीकृत डॉक्टर व दवाखाने अवयवदानाचे प्रत्यारोपण करू शकतात. जर रुग्णाचे नातेवाईक कोणीही नसतील, रुग्ण बेवारस असेल तर प्रत्यारोपण करताना प्रत्यारोपण समितीची परवानगी घेणे अत्यावश्यक असते. पती-पत्नी किंवा रक्ताचे नातेवाईक एकमेकांना किडनी दान देऊ शकतात किंवा अवयवदान देऊ शकतात. अवयवदान एक चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे. कोरोना महामारीच्या धक्क्याने आज अनेक माणसे केवळ हृदयविकाराने मृत्यू पडत आहेत. अशावेळी त्यांच्या नातेवाईकांनी पुढे येऊन अवयवदान केले पाहिजे म्हणजेच एक राष्ट्रीय कार्य समजून पुढे येवून अवयवदान करणे गरजेचे आहे. सैनिक सीमेवर लढतात, देशाचे रक्षण करतात अशा परिस्थितीत जर राष्ट्रीय कर्तव्य करत असताना जर शरीराचा एखादा अवयव निकामी झाला, तर आपण केलेल्या अवयव दानातून त्या सैनिकाला एक नवसंजीवनी मिळवून तो पुन्हा हा कार्य करण्यास सक्षम होऊ शकतो. अवयवदानाची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्व सरकारी दवाखान्यात अवयवदानाचे फॉर्म उपलब्ध आहेत. ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूनंतर आपले अवयवदान करायचे आहे, त्याने तो फॉर्म भरावा, तरच त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या इच्छेनुसार सहा तासांच्या आत त्याचे अवयवदान व प्रत्यारोपण करणे शक्य आहे. अवयवदान कोणीही करू शकतो. मुलाने वडिलांना किडनी दिली,भावाने बहिणीला किडनी दिली अशी उदाहरणे आज समाजामध्ये आपण ऐकलेली आहेत. इतके मौल्यवान आपले शरीर असताना आपल्या मृत्यूनंतर या शरीरातील आपले अवयव जर आपण दुसर्‍याला दान दिले तर ते एक मोठे सामाजिक कार्य आपल्या हातून घडेल व मृत्यूनंतरही आपण हे जग पाहू शकतो. मग ते डोळ्यांनी असेल किंवा आपल्या अवयवांनी असेल आणि म्हणूनच अवयवदान ही चळवळ संपूर्ण भारत देशामध्ये हे प्रभावी व्हावी व घराघरात पोहोचावी यासाठी मी अवयवदान करणारच असा संकल्प प्रत्येक सुजाण नागरिकाने करणे आज काळाची गरज आहे. मी उमेश माधव खिराडे (गुरुजी) माझ्या जायंटस वेल्फेअर फाऊंडेशनच्यावतीने जनतेस अवयवदान करण्याचे नम्र आवाहन करीत आहे.

 
- उमेश खिराडे
(शब्दांकन अनंता दुबेले)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.