सेंट्रल रेल्वे ..कोरोना योद्धा

    दिनांक  09-Sep-2020 18:38:34
|


CR_1  H x W: 0कोरोनाशी सामना करण्यासाठी भारत सरकार, प्रशासन आणि भारतीय समाज सज्ज झाला आहे. नव्हे भारतीय समाजाची मानसिकता ही लेचीपेची नाही तर कोरोनाशी मुकाबला करताना सर्वच आघाड्यांवर आपण यशस्वीही होत आहोत. कोरोनाचा संसर्ग वाढतोय. पण कोरोनाशी लढताना आपण कुठेही कमी पडत नाही. याचे कारण भारतीय प्रशासन आणि जनता एकदिलाने कोरोना काळातही काम करत आहे. डॉक्टर, पोलीस, सपाई कामगार, बेस्ट कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान आहेच. पण कोरोना काळात रेल्वे सुद्धा कार्यात कुठेही कमी पडली नाही. माटूंगा कारशेडने या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी उत्तम योगदान दिले. रेल्वे कर्मचारीही आपआपल्या परीने कार्यरत होते. त्याचा घेतलेला हा आढावा...

कोरोनाने आपल्या देशातही हातपाय पसरायला सुरुवात केली. मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात कोरोनाबद्दलच्या उलटसुलट चर्चा ऐकू येऊ लागल्या. आपल्या इकडे कोरोनाचे काही चालणार नाही, असे म्हणत मार्चच्या पहिल्या आठवड्यातही मुंबई सुरूच होती आणि मुंबईची लाईफलाईन रेल्वेसेवाही सुरूच होती. मात्र, दिवसागणिक कोरोनाचा हाहाकार वाढला. त्यावेळी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’साठी लोकांनी आणि काही कार्यालयांनी आपणहून ‘होम क्वारंटाईन’ राहणे पसंत केले. अर्थात, त्यावेळी ‘होम क्वारंटाईन’ शब्द तितका माहिती नव्हता. त्यावेळी हळूहळू ओस पडलेली भाजी मार्केट, सार्वजनिक वाहतूक यावर चर्चा करताना नाक्यानाक्यावर उभे राहणारे नेहमीचे ओळखीचे म्हणू लागले की कोरोनाचा आजार भारी संसर्गजन्य आहे. कशाला विषाची परीक्षा त्यापेक्षा घरीच राहू. दोन-तीन दिवस घरी राहिल्याने काय होईल? तेवढाच कामाला आरामही आणि अशीच चर्चा होई. या चर्चेचा शेवट होई - सर्व जग थांबेल पण मुंबईची रेल्वे थांबणार नाही. रेल्वे कर्मचारी म्हणून त्यावेळी आम्हा रेल्वे कर्मचार्‍यांनाही अभिमान वाटायचा. हो ! आमची रेल्वे कधीही थांबणार नाही. ऊन-वारा पाऊस, दंगल, बॉम्बस्फोट आणि काही काही घडले तरी रेल्वे थांबली नव्हती आणि कर्मचारी म्हणून आम्हीही कधी थांबलो नव्हतो. रेल्वेत काम करणे म्हणजे एकापरीने जनसेवा आणि राष्ट्रसेवाच होती. तसेही माटुंगा रेल्वे कारशेड म्हणजे एक दुसरी दुनिया. रेल्वेच्या महाजाळाचे ते स्वतंत्र विश्व. बाहेरच्यासाठी एक भुलभुलैय्याच. अगणित कर्मचारी इथे कामाला. सर्व भाषिक, सर्व धर्मीय आणि विविध स्तरातले. प्रत्येक डिपार्टमेंटचे आपले स्वतंत्र कौशल्य. प्रत्येक डिपार्टमेंटच्या व्यक्तीची आपली स्वतंत्र ओळख. मात्र, असे जरी असले तरी ‘रेल्वेवाला हूं’ असे म्हणताना प्रत्येकाची मान ताठ होणारच असली समानता. माटुंगा कारशेड आमचे दुसरे घरच. वसई-विरारहून सोबतच सहकारी कामाला यायचे. कित्येक दशकं आमची जीवाभावाची मैत्री, हक्काची सुट्टी वगळता आम्ही सगळ्यांनी दुपारचा डब्बा एकत्र खाल्लेला. दसरा-दिवाळी-गणपती, सगळ्या महापुरूषांच्या जयंती इतकेच काय संकष्टी चतुर्थीही उत्साहात साजरी करायचो. इथे सगळ्या पक्षांच्या कर्मचारी युनियन. बाहेर युनियनचे काहीही असो, मात्र आतमध्ये आम्हा सर्व कर्मचार्‍यांच सख्ख्या भावासारखं नातं. नातं माटुंगा कारशेडने जोडलेलं.


मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून रेल्वेसेवा काही दिवस बंद केली गेली. आमचे माटुंगा कारशेडही बदं झाले. कोरोनामुळे आम्हालाही रजा दिली गेली. धडधडती लोकल अचानक अनपेक्षितपणे थांबावी आणि त्यानंतर जसे वाटावे, तसेच आम्हा प्रत्येक रेल्वे कर्मचार्‍याच्या आयुष्यात झाले. आम्ही कर्मचार्‍यांनीही ठरवले की रेल्वेमध्ये काम करताना आपण जनसेवाच करायचो. घरी राहायची सवय नव्हतीच. असे घरी राहून करायचे तरी काय? कुटुंबासोबत कधी नव्हे ते घरी शांत चित्ताने राहायला मिळाले होते. पण तरीही मनात एक खंत होती की, समाज कोरोनाने त्रासलेला असताना आपण काय करत आहोत. सरकारी सेवेत असल्यामुळे आपल्याला नोकरी गमावण्याची तितकी भीती नव्हती. पण याच काळात कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या. दोन वेळचे अन्न मिळणेही मुश्किल झाले. आपणही काहीतरी केले पाहिजे ही भावना स्वस्थ बसू देईना. काम बंद असल्याने सहकारी भेटत नसले तरी दररोज फोनवर ख्यालीखुशाली विचारणे होत असे. अशाच एका चर्चेतून आम्ही मित्रांनी ठरवले की, आपापल्या परिसरामध्ये आपण सेवाकार्य करायला हवे. याच काळात विक्रोळीमध्ये रा. स्व. संघ, तसेच भाजपच्या माध्यमातून आमचे मित्र सुरेश यादव गरजू-गरिबांना अन्न वितरण करत होते. मग मीही परिसरातील गरजू-गरीब ५० व्यक्तींची यादी बनवली. त्या व्यवस्थेतून दररोज सकाळ-संध्याकाळ या लोकांना घरपोच अन्न वितरीत करू लागलो. तसेच स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मास्क, सॅनिटायझर्स, अन्नधान्य ते कोलगेटचे वाटपही केले. आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये कोरोनाची भीती वाढतच होती. साधा सर्दी-खोकला झाला तरी माणूस घाबरून जास्तच आजारी पडू लागला. या लोकांचे समुपदेशन करणे गरजेचे होते. त्यामुळे आजारी असलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष दुरून भेटून किंवा फोनवरून त्यांना धीर देण्याचे, उपलब्ध माहिती सांगण्याचे काम सुरू केले. त्यावेळी आजारी माणसाला नुसते ‘घाबरू नका हो, काही होत नाही,’ असे म्हटले तरी त्या माणसाला खूप आनंद वाटे. कारण, त्या काळात सगळेच त्याच्याकडे कोरोना झाला की काय, या संशयाने बघत असत. याच काळात वस्तीपातळीवर आरोग्य शिबीरही आयोजित केले. आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायलाही लोक घाबरत होती. त्यांना वाटत होते ना जाणो कोरोना निघालाच तर आपली धडगत नाही, आपल्याला कोणत्या तरी दवाखान्यात टाकतील आणि आपल्या कुटुंबाला आणि आजुबाजूला, वस्तीला कुठेतरी ‘क्वारंटाईन’ करतील. लोकांच्या मनात कितीतरी भीती होती. ही भीती कशी घालवावी, हा मोठा प्रश्न होता. त्यातच आमच्या कारशेडमधले ही एक-दोन जण कोरोनाचे बळी झाले होते. त्यांच्या आठवणींनी जीव व्याकूळ होत होता.
 
 
अशातच बससेवा सुरू झाल्या. ‘बेस्ट’चे कर्मचारी, सफाई कामगार, डॉक्टर, पोलीस यांची जनसेवा सुरूच होती. ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांचा उचित आदर सन्मानही समाजाने केला. पण या सर्व काळात रेल्वे कर्मचारी काय करत होता? या सर्व काळात मात्र माटुंगा कारशेडमध्ये काय होत असेल? हे सगळे होत असताना रेल्वे कशी मागे राहील? रेल्वेनेसुद्धा ३३ टक्के कर्मचार्‍यांसह कामाला सुरुवात केली. रेल्वेसेवा बंदच होती. कारशेडमध्ये तसे काही पूर्वीसारखे काम नव्हतेच. त्यावेळी रेल्वेसेवेत रूजू असणार्‍या कर्मचार्‍यांनी मास्क, ‘पीपीई किट’ बनवले, सॅनिटायझर बनवले. रेल्वेच्या जागेचा सुविधेचा वापर अगदी योग्य प्रकारे समाजसेवेसाठी केला. मास्क बनवणे किंवा पीपीई किट बनवणे तसे नवीनच काम होते. पण रेल्वे कर्मचारी हे काम तत्काळ शिकले आणि त्यांनी ते बनवले. सार्वजनिक सेवेत काम करणार्‍या, अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांसाठी, आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी मास्क आणि पीपीई किट बनवले गेले. त्यामुळे अनपेक्षित असलेल्या कोरोनाच्या संकटातही काही प्रमाणात कोरोनाशी लढताना मास्क आणि पीपीई किट उपलब्ध झाले. नंतर या काळात सेंट्रल रेल्वेने सकाळी चार टे्रन आणि संध्याकाळी चार टे्रन सुरू केल्या. अत्यावश्यक सेवेत असलेले आणि कोरोना काळात काम करण्याचे ओळखपत्र असेलेले लोक प्रवास करू लागले. कामधंद्याला जाऊ लागले. मग आमच्या कर्मचार्‍यांचीही ड्युटी सुरू झाली. सुरुवातीला महिन्यातून तीन दिवस कामाला जायचे. अर्थात, लोकल ट्रेन धावत नसल्याने आणि लांबपल्ल्याच्या गाड्याही धावत नसल्याने आम्हालाही नेहमी इतके काम नव्हतेच. पण या काळात माटुंगा कारशेडकडे नव्याने बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला लाभला. नित्याचीच कामे कंटाळवाणी न होता रंजक वाटू लागली. नेहमची कामे वेगळ्या आयामातून कसे करू शकतो, याचा नव्याने जणू शोधच लागला. मी ‘डिव्ही सेक्शन’ला कामाला आहे. रेल्वे ब्रेक सिस्टिमवर इथे काम चालते. आजवर शिकवले गेलेल्या तंत्रज्ञानाने आम्ही काम करत असू. पण या काळात डिव्ही मशीन, ब्रेक याबाबत सखोल विचार करायची जणू प्रेरणाच मिळाली. रेल्वे सुरू झाली आणि रेल्वे पोलिसांनाही ताण पडला. कारण, रेल्वे स्थानकावर उगीचच कुणी बसू नये किंवा टे्रन सुरू झाली म्हणून कुणीही उगीचच ट्रेनमधून भटकू नये हे पाहण्याची जबाबदारी त्यांची होती. रेल्वे ही जनतेची संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्याचे कामही ते चोखपणे बजावत होते. माटुंगा कारशेडमधला कामाला रूजू होणारा प्रत्येकजणही असाच आपली जबाबदारी समजून कामाला येऊ लागला. सुरुवातीला महिन्याला तीन दिवस काम होते ते आता आठवड्याला तीन दिवस झाले. सर्व काही व्यवस्थित सुरू होणे याला ‘रेल पटरीपर आगयी’ असे म्हटले जाते. तर हळूहळू माटुंगा कारशेडही पटरीवर आले आहे. लवकरच पूर्वीसारखे सर्व काही आलबेल होईल. पूर्वीसारख्याच लोकल्स धावू लागतील. पूर्वीसारखेच माटुंगा कारशेडचे काम १०० टक्के सुरू होईल.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.