जग कोरोनाच्या विळख्यात : चीन सुशेगात !

    दिनांक  08-Sep-2020 14:15:56
|
hubei tourism recovery ga
 

( चीनमध्ये प्लाया माया वॉटर पार्क, वुहानमध्ये आनंद लुटताना चीनी पर्यटक - १५ ऑगस्ट २०२०) 


वुहान : कोरोनामुळे जगावर आर्थिक आणि आरोग्याचे संकट ओढावले असताना चीनमध्ये आता सर्वकाही सुशेगात असल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुरळीत सुरू झाले असून शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयेही पुन्हा सुरू झाली आहेत. अशातच चीनच्या पर्यटनालाही बहर आली असून जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वुहान शहरात पर्यटनात ४० टक्के वाढ झाली आहे. या सोबतच १५ ऑगस्ट २०२० रोजी एका रिसॉर्टमध्ये पर्यटक मजा लुटत असल्याचा फोटोही ग्लोबल टाईम्सने शेअर केला आहे.
 
 
हुबेई येथील परिस्थिती आता कोरोना महामारीच्या संकटाच्या आधीप्रमाणेच झाली असल्याचेही ग्लोबल टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चीनने आता 'ट्रॅव्हल विद् लव्ह टू हुबेई', अशी संकल्पना पुढे आणली आहे. ८ ऑगस्टच्या डेटानुसार ही योजना लागू झाल्याचे समजत आहे.
  
 
रविवारपर्यंत एकूण १४.७ दशलक्ष लोकांनी हुबई येथे भेट दिल्याची आकडेवारी आहे. तसेच यामुळे कोट्यवधींची उलाढालही झाल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे. हुबेई ब्युरो ऑफ कल्चर आणि टुरिझमतर्फे ही आकडेवारी देण्यात आली आहे. ९३ टक्के हॉटेल्स पुन्हा सुरळीत सुरू झाली आहेत. आठवडाअखेरीस ४८ टक्क्यांपर्यंत बुकींग तर आठवड्यात ४५ टक्के बुकींग फुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे.
  
 
वुहान शहरात ऑगस्टमध्ये विमान प्रवासाची आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढली आहे. विमान तिकीटातून मिळणाऱ्या रक्कमेत एकूण ३० टक्के वाढ झाली आह. हॉटेल बुकींगच्या आकडेवारीनुसार महसुलात जुलैच्या तुलनेत ४० टक्के वाढ झाली आहे. पंचतारांकीत हॉटेल्सचा महसुल २०१९ च्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढला आहे. हुबेई शहरात झपाट्याने परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. सप्टेंबर महिन्यात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत मुलांचे स्वागत केले आहे. दैनंदिन कामकाजासह मनोरंजन, पुल पार्टी, म्युझिक फेस्टीवल्स आणि शोज् अगदी धडाक्यात सुरू असल्याचे ग्लोबल टाईम्सचे वृत्त आहे.
  
 
तिकडे जगात मात्र, कोरोनाची परिस्थिती आणखी भयावह बनत चालली आहे. देशात कोरोनाचे एकूण ४२ लाख रुग्ण झाले आहेत. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान भारतात एकूण पाच लाख ८९ हजार ६४४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या सात दिवसात सलग हजारांहून जास्त मृत्यू होत आहेत. जगभरात दोन कोटी ७३ लाख इतके कोरोना रुग्ण झाले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.