बोरिवली नॅशनल पार्क रेस्क्यू टीमचे 'मिशन रत्नागिरी'; 'त्या' बिबट्याला जेरबंद करणार

    दिनांक  07-Sep-2020 16:31:21
|

leopard _1  H x


ग्रामस्थांच्या दबावानंतर बिबट्या पकड मोहिम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात रत्नागिरीतील मेर्वीत बिबट्याच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे (नॅशनल पार्क) 'बिबट्या बचाव पथक' रत्नागिरीत दाखल झाले आहे. ग्रामस्थावर हल्ला करणारा बिबट्या मादी असून ती पिल्लांसमेवत या परिसरात असल्याने या बिबट्याला पकडणे पिल्लांच्या भविष्याच्या दृष्टीने कितपत योग्य ठरेल, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. 
 
 
 
रत्नागिरीच्या जांभूळआड गावात शुक्रवारी ग्रामस्थ जनार्दन चंदुरकर यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाला. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास गुरे चरायला सोडून घरी परतताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. चंदुरकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हल्ला करणारा बिबट्या हा दोन पिल्लांसोबत त्याठिकाणी होता. त्यामुळे हा हल्ला मादी बिबट्याने आपल्या लहान पिल्लांच्या सुरक्षेसाठी बचावात्मक दृष्टीने केल्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीपासून या परिसरात 'मानव-बिबट्या संघर्षा'च्या घटना वारंवार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथील दुचाकी स्वार चालकांवर बिबट्या हल्ला करत होता. अशा परिस्थितीत शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी झाली. त्यामुळे वन विभागाने या परिसरातील बिबट्याला पकडण्याची तयारी सुरू केली आहे. 
 
 
leopard _1  H x 
 
 
या कामासाठी रविवारी रात्री मुंबईतील बोरिवली 'नॅशनल पार्क'चे 'बिबट्या बचाव पथक' रत्नागिरी दाखल झाले. हल्ल्यास कारणीभूत असलेल्या बिबट्याला पकडण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून मिळाल्याची माहिती रत्नागिरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड यांनी दिली. या कामात वैद्यकीय मार्गदर्शनाकरिता राष्ट्रीय उद्यानाच्या माजी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. विनया जंगले यांना पाचरण्यात आले आहे. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी 'कॅमेरा ट्रॅप' लावले असून पिंजरेही लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हल्ल्यास कारणीभूत असलेली बिबट्या मादी असून तिच्यासोबत पिल्ले आहेत. अशा परिस्थितीत या मादी बिबट्याला पकडल्यास तिच्या पिल्लांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.