स्थानिक काश्मिरी तरुणांचा हिंसेला नकार दहशतवादी संघटनांमधील सहभागात ४२ टक्क्यांची घट

    दिनांक  07-Sep-2020 20:19:39   
|
IA_1  H x W: 0

स्थानिक काश्मिरी तरुणांचा हिंसेला नकार
 
दहशतवादी संघटनांमधील सहभागात ४२ टक्क्यांची घट
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० संपुष्टात येऊन आता एक वर्ष झाले आहे. या एक वर्षात प्रदेशातील स्थिती मोठ्या झपाट्याने सुधारत आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याचे स्थानिक काश्मिरी तरुणांचे प्रमाण तब्बल ४२ टक्क्यांनी घटले आहे.
 
जम्मू – काश्मीर राज्यास विशेषाधिकार देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ संपुष्टात आणण्याचा निर्णय गतवर्षी केंद्र सरकारने घेतला होता. त्याचप्रमाणे प्रदेशाचे विभाजन करून जम्मू – काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचीही निर्मिती करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेस आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात काश्मिरमधील स्थिती झपाट्याने सुधारत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयास स्थानिक जनतेनेही स्विकारले असल्याने फुटीरतावादी पक्षांचीही आता गोची झाली आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे स्थानिक काश्मिरी तरुण आता हिंसेला नकार देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास प्राधान्य देऊ लागला आहे. त्यामुळे पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.
 
 
दहशतवादी संघटनांमधील भर्ती घटली
 

IA 2_1  H x W:  
 
 
आकडेवारीच्या रूपात पाहिल्यास दहशतवादी संघटनांमध्ये २०१८ साली २१९ स्थानिक तरुण भर्ती झाले होते, तर २०१९ साली हा आकडा ११९ होता. मात्र, जून २०२० पर्यंत केवळ ७४ तरुण भर्ती झाले आहेत.
 
 
काश्मिरी तरुणांचे ब्रेनवॉशिंग करणे, त्यांच्या मनात भारताविषयी, सरकारविषयी द्वेष निर्माण करणे आणि अखेरीस त्यांची भर्ती दहशतवादी संघटनांमध्ये करणे, हे चक्र काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे सुरू होते. त्यामुळे काश्मिरी तरुण हा पाकसाठी दहशथवादी कारवायांचा कच्चा माल ठरत होता. मात्र, कलम ३७० नंतर केंद्र सरकारने अतिशय नियोजबद्ध पद्धतीने तेथे रोजगार आणि विकासाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे भारतीय लष्कराने पाकिस्तान – आयएसआय – दहशतवादी संघटना यांचा खरा चेहरा अनेक प्रकारे काश्मिरी तरुणांसमोर उघडा पाडला. त्यामुळे पाकिस्तान केवळ आपला वापर करून घेत आहे, याची जाणीव तरुणांना झाली. परिणाम दहशवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याच्या प्रमाणात तब्बल ४२ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आता काश्मीर खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांची संख्या आता २०० पेक्षाही खाली गेली आहे. केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराच्या प्रयत्नांना येत असलेले हे यश अतिशय महत्वपूर्ण ठरत असून काश्मीरमधून फुटीरतावाद आणि दहशतवाद हद्दपार करण्याच्या मनसुब्यांना यामुळे बळ मिळाले आहे.
 
 
भारतीय लष्कराने त्यासाठी अनेक पातळ्यांवर आपले काम सुरू केले आहे. त्यामध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे समाजमाध्यांवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरावर नियंत्रण ठेवणे. यामुळे तरुणांची डोकी भडकविण्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्याचप्रमाणे भारतीय लष्कराने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांचे कान आणि डोळे असणाऱ्या जवळपास २४० जणांना यंदाच्या वर्षात अटक केली आहे. तरुणांमध्ये अस्वस्थता पसरविणे, सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती दहशतवाद्यांना पुरविणे अशा प्रकारचे काम ही मंडळी करीत असत. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेस उसळणारी गर्दी डोकेदुखी ठरत असे. त्यास आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ मृतांच्या जवळच्या मोजक्याच नातेवाईकांना अत्यसंस्कारात सहभागी होण्याची परवानगी देण्याचे धोरण सुरू केले. त्यामुळे अंत्ययात्रांद्वारे तरुणांच्या मनात फुटीरतावादाची बीजे रोवण्याच्या पाकच्या मनसुब्यांना धक्का बसला. विशेष म्हणजे जनतेनेही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केलेली नाही. यामुळे दगडफेकीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यापूर्वी २०१६ साली सुरक्षा दलांना दगडफेकीच्या घटनांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला होता.
 

IA 1_1  H x W:  
 
 
एकुणच काश्मिर खोऱ्यात भारतातर्फे नरसंहार केला जातो, या पाकच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील अपप्रचारास आता काश्मिरी जनताच चोख प्रत्युत्तर देऊ लागली आहे. त्यामुळे पाक आता पूर्णपणे उघडा पडला आहे. काश्मिरी जनतेने आता विकास आणि शांततेस आपला कौल दिला आहे, त्यामुळे आता प्रदेशाची स्थिती झपाट्याने बदलत आहे. भारतीय लष्करातर्फे काश्मीरमध्ये चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांनादेखील मोठा प्रतिसाद काश्मिरी जनता देत आहे. त्यात युवकांसाठी सैन्य भर्तीपूर्वी प्रशिक्षण, खेळांच्या स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, आरोग्य कॅम्प आदींमध्ये नागरिक आनंदाने सहभागी होत आहेत. तरीदेखील कोणत्याही संकटांचा सामना करण्यास भारतीय सैन्य सक्षम असल्याची ग्वाही लष्करातर्फे देण्यात आली आहे.
 
 
भारतीय लष्कराच्या प्रयत्नांना यश
 
 
दहशवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना यमसदनी धाडणे यामुळे पाकच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलैपर्यंत हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश ए महंमद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांच्या १३६ कडव्या दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे, त्यात १४ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामध्ये रियाझ नायकू, बुरहान कोका, बशिर कोका यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात १८, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रत्येकी ७, एप्रिलमध्ये २८, मे महिन्यात १८, जूनमध्ये ४९ आणि जुलैमध्ये २१ असे आतापर्यंत एकुण १४८ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यास भारतीय लष्कराला यश आले आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.