गतिमान झालेल्या मुंबईत प्रदूषणाच्या पातळीतही वाढ!

    दिनांक  07-Sep-2020 17:17:50
|
pollution _1  H


मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित!


मुंबई : मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमधून शिथिलता मिळू लागताच मुंबईची गती वाढू लागली आणि प्रदूषणाच्या पातळीही वाढ होऊ लागली.


कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन पुकारताच मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत कमालीची घाट झाली होती. मुंबईकर मोकळा श्वास घेऊ लागले होते. मात्र हळू हळू शिथिलता दिली जाऊ लागली आणि मुंबईची गती वाढताच प्रदूषणाची पातळी चढू लागल्याने मुंबईकरांचा श्वास कोंडू लागला आहे.


गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याबरोबर मुंबईमध्ये ठिकठिकाणी धुकेही जाणवत होते. त्यामुळे नागरिकांत अस्वस्थताही अधिक होती. मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित होत असल्याची जाणीव हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरून होत आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०० वर पोहोचला होता. सोमवारीही हा निर्देशांक ९७ च्या आसपास होता. सफर या हवेची गुणवत्ता नोंदणाऱ्या प्रणालीतर्फे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


लॉकडाउनच्या काळात ५० ते ६० हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदला गेला होता. त्यानंतर या निर्देशांकाने १०० चा आकडा गाठल्याने पुन्हा एकदा प्रदूषणाचा स्तर उंचावू लागल्याचे निदर्शनास आले. बोरिवली, मालाड, अंधेरी, वरळी, माझगाव येथे हवेचा दर्जा घसरून मध्यम नोंदला गेला तर वांद्रे-कुर्ला संकुल येथे हा दर्जा फारच खाली घसरला. मुंबईतील कुलाबा, चेंबूर आणि भांडुप या तीन केंद्रांवर हवेचा दर्जा समाधानकारक असल्याचे नोंदले गेले. नवी मुंबईमध्येही हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले.


वांद्रे-कुर्ला संकुल येथे पीएम २.५ या प्रदूषकांची पातळी ३०४ नोंदली गेली. तर पीएम १० ची पातळी १२८ होती. बोरिवलीमध्ये पीएम १० आणि पीएम २.५ या दोन्हीची पातळी १३५ च्या पुढे होती, मालाडमध्ये पीएम २.५ ची पातळी १३५ होती तर पीएम १० ची पातळी १०६ होती. अंधेरीमध्ये पीएम २.५ ची पातळी १०१ नोंदली गेली. वरळीमध्ये ओझोनचे प्रमाण ११८ होते. तर माझगावमध्ये पीएम १० चे प्रमाण १०८ होते.


सफरच्या माध्यमातून अनलॉक-१ आणि अनलॉक-४ यांची तुलना नोंदवण्यात आली आहे. यामध्ये अनलॉक-४ च्या काळामध्ये नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीमध्ये मुंबईत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे या शहरांच्या तुलनेत मुंबईतील ही वाढ सर्वाधिक आहे. हे निरीक्षण १४ दिवसांसाठी करण्यात आले होते. अनलॉक-१च्या १४ दिवसांपैकी १० दिवस पावसाचे होते, असे सफरतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अनलॉक-४ च्या काळामध्ये वाहतुकीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.