‘आत्मनिर्भर भारत’ ज्ञानेश्वरीतून...

07 Sep 2020 18:56:06

Dnyaneshwar_1  

 

 

आज, मंगळवार, दि. ८ सप्टेंबर, भाद्रपद कृष्ण षष्ठी. या दिवशी दरवर्षी ‘ज्ञानेश्वरी जयंती’ साजरी केली जाते. यंदा ७३०वी ‘ज्ञानेश्वरी जयंती’आहे. ‘आत्मनिर्भर भारता’ची संकल्पना आपल्या संतांनी हजारो वर्षांपूर्वी स्पष्ट केली आहे. ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने विश्वकल्याणाचा संकल्प विश्वमाऊलींच्या ओवीतून साकारण्याचा केलेला हा प्रयत्न.



सहा महिन्यांचा काळ लोटला तरी कोरोनाचे संकट संपायची चिन्हे दिसत नाहीत. सुक्ष्मातिसूक्ष्म अशा विषाणूने मानव जातीला रोखून त्याच्या भौतिक विकासाला बांध घातला. तसेच वैज्ञानिकांनाही भानावर आणले. केवळ जीडीपी भक्कम असला की आपण जगावर राज्य करू शकतो, या आविर्भावात अर्थकेंद्री वाटचाल करणार्‍या बलाढ्य राष्ट्राचेही या विषाणूने गर्वहरण केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी अण्वस्त्रे आणि यंत्रसामग्रीवर अहोरात्र भर देणार्‍या विकसनशील राष्ट्रांना आपण अणुबॉम्ब येईल तेव्हा येईल, मात्र न दिसता, जाणविणारा ‘विष-अणू’ बॉम्ब कधी आला आणि त्याने या राष्ट्रांची वैद्यकीय वा आरोग्य यंत्रणा किती अशक्त आहे, हे ठसठशीतपणे अधोरेखित केले. कोरोना विषाणूने मानवजातीला आत्मचिंतन करायला भाग पाडले. या संकटाच्या काळात अर्थकेंद्री नव्हे, तर मानवकेंद्री आचारच जगताच्या उपयोगी पडतो आहे. हा मानवकेंद्री विचारच भारतीय संस्कृतीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. या प्रचंड नुकसानीत चिंताक्रांत झालेल्या समाजाला-


 
वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ।
भोगणे ते फळ संचिताचे॥


 
असा चित्ताची समजूत काढणारा संदेश देत ‘चरैवेति चरैवेति’चा मूलमंत्र अध्यात्माने दिला. आरोग्य यंत्रणा आपले परिपूर्ण सामर्थ्य वापरून शारीरिक स्वास्थ्य सांभाळत असताना मानसिक स्वास्थ्य शाबूत ठेवण्याचे अत्यंत कठीण काम अध्यात्म करत आहे. जगावर राज्य करत असलेल्या या महाभयंकर संकटाला सामोरे जाण्यात भारतात काही प्रमाणात यश आले आहे. त्याचे महत्त्वपूर्ण कारण आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा धोका ओळखून वेळीच उचललेली पावले आणि त्या योगाने सक्रिय झालेली यंत्रणा.


 
संकल्पे सृष्टी घडि।


 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १२ मे रोजी केलेल्या भाषणात ‘संकटे ही संकेत संदेश आणि संधी देतात,’ हे विधान खरे आहे. कोरोना संकटाने जगाला संरक्षण यंत्रणेसह आरोग्य व्यवस्था सामर्थ्यवान करण्याचा संकेत दिला. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही, हा संदेश दिला. जीवनात प्रत्येकाने हा संकेत आणि संदेश घेऊन या संकटातही संधी शोधत आपल्या उत्क्रांतीचा संकल्प करायचा असतो. विश्व निर्माणाची ताकद या संकल्पात असते.


एैसे जगाचे बीज जो संकल्पु। संकल्पे सृष्टी घडि॥


 
हेच माऊली ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. या संकटात आपले कितीही भौतिक नुकसान झाले असले तरी पुन्हा सर्व नवनिर्माणाचा संकल्प केलाच पाहिजे. एकदा हा दृढ संकल्प केला की, नंतर ‘तैसे संकल्पे होय आधवे’ या संकल्पाच्या जोरावर सर्वकाही शक्य आहे, असेच माऊली सांगतात.

 
आत्मनिर्भर हाच पंथराजू


 
या महाभयावह संकटातून राष्ट्राला बाहेर काढत आणि एकविसाव्या शतकात भारताला विश्वगुरू बनण्याची संधी शोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक संकल्प दिला. ‘एषः पन्था.’ वैराग्यसंपन्न झालेल्या अर्जुनाला ब्रह्मप्राप्तीचा मार्ग सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘अर्जुना, हा अवधारी। पंथराजु॥‘ तसाच आजच्या प्रसंगी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत.’ आपले पंतप्रधान नेहमीच आपल्या भाषणात संस्कृत श्लोक, सुभाषितांचे प्रमाण देतात. त्यांची कोणतीही कल्पना ही नित्यनूतन चिरपुरातन या संकल्पनेतून असते. ‘आत्मनिर्भर भारत’ हे अनेकांना नवीन काहीतरी असल्याचे वाटून अचंबित करत असले तरी स्वतः पंतप्रधानांनीच सर्व ‘परवैश दुःख सर्वमात्मवशं सुखम’ हा मनुस्मृतीतील श्लोक उद्धृत करून ‘आत्मनिर्भरते’चे बीज आपल्या सनातन संस्कृतीतच असल्याचे सांगितले आहे. मनुस्मृतीप्रमाणेच,


 
प्राच्यापंद न व्यथते कदाचिदुद्योगमन्विच्छति चाप्रमत्तः।
दुःख च काले सहते महात्मा धुरन्धरस्तस्य जिताः सप्तनाः॥


 
या भगवद्गीतेतील श्लोकात ‘उद्धरेदात्मनानं नात्भानमवसाद्येन’द्वारे आत्मनिर्भर होण्याचा संदेश आहेच. भगवान बुद्धांनी ‘अत्तदीपो भव।’ तर विनोबाजींनी ‘उद्धरावा स्वये आत्मा’, तर तुकोबांनी ‘आपुलिया बळे घालावी हे कास। न घेणेचि आस आणिकाचि॥‘ याच मार्गाने जाण्याचा संदेश विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी दिला. ‘आपुली आपण करा सोडवण।’


 
आत्मनिर्भर होण्याचा आपला मार्ग निश्चितच खडतर असेल, मात्र घाबरून न जाता आपल्याच मार्गावर चालण्यात माऊलींच्या या ओवीतून आपल्याला बळ मिळेल.


 
अगा स्वधर्मु हा आपुला। जरि कां कढिणु जाहला।
तरी हाचि अनुष्ढिला। मला देखें॥


किंवा


अगा आपुला हा स्वधर्मु। आचरणी जरी विषमु।
तरी पाहावा तो परिमाणु फळेल जेणे॥


अन्नधान्याबरोबर ऊर्जा, संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान, औषधे निर्माण या सर्वच क्षेत्रांत आपण स्वावलंबी होणे, हाच आपला ‘आत्मनिर्भरते’चा संकल्प आहे. महात्मा गांधी, पं. दीनदयाळजी यांची कास धरून पंतप्रधान मोदींनी ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा दिला आहे. दुसर्‍याचा आचार दिसण्यास कितीही चांगला वा सुलभ वाटत असला तरी आचरण करताना आपलाच करावा,


येरू आचारू जो परावा। जो देखता कीर बरवा।
परी आचरतेनि आचरावा। आपुलाचि॥


याही पलीकडे जाऊन माऊली ज्ञानोबाराय सांगतात की,


म्हणोनि आणिकांसी जे विहित। आणि आपणापेथा अनुचित।
ते नाचरावें जरी हित। विचारेजे॥
या स्वधर्मातें अनुष्ठितां। वेचु होईल जीविता।
तोहि किसा वर उभयतां। दिसत असे॥


इतरांच्या कितीही चांगल्या आणि सुलभ मार्गापेक्षा आपला मार्ग कसाही असला तरी तोच कसा योग्य आहे, हे सांगण्यासाठी ज्ञानोबाराय आणखी काही उदाहरणे देतात. लोकांची आकर्षक घरे पाहून आपली गवताची झोपडी मोडावी का?


आणि आपुली माये। कुब्ज जरी आहे।
तरी जीजे तें नोहें। स्नेह कुर्‍हे कीं॥
येरी जिया पराविया। रंभेहुनि बरविया।
तिया काय कराविया बाळकें तेणें॥


आपली आई कुबडी असली तरी तिच्याच प्रेमाने आपण जगतो. इतर परक्या स्त्रिया रंभेपेक्षाही सुंदर असल्या तरी त्या बालकाला काही उपयोगाच्याच नाहीत. पाण्यापेक्षाही जास्त गुण तुपात असतात, मात्र माशाला त्यात राहून कसे जमेल? म्हणूनच इतरांच्या मार्गाने किंवा आधाराने वाटचाल करणे म्हणजे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल.


येरा पराचारा बरविया। ऐसें होईल टेंकलेया।
पायांचें चालणें डोइया। केले जैसें॥


म्हणूनच इतरांचे हे सर्व मार्ग टाकून देऊन स्वतःच ‘आत्मनिर्भर’ झालो तरीच माऊलींच्या उक्तीनुसार तरी आपली स्वस्ति सहजें। आपण केली॥ असे म्हणता येईल.


भारताने ‘आत्मनिर्भर’ होणे म्हणजे जगातून वेगळे होणे नव्हे, तर संपूर्ण विश्वाला सुख, सहयोग आणि शांती प्रदान करण्याचा संकल्प आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा या ‘आत्मनिर्भर भारता’चा आत्मा आहे. विश्वकल्याणाचा हाच मंत्र विश्वमाऊलींनी ‘हे विश्वचि माझे घर’ किंबहुना ‘सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी’ अशा अनेक ओवींतून दिला आहे.


आपण स्वतःसह विश्वकल्याणासाठी आरंभिलेला ‘आत्मनिर्भर भारत’ नक्कीच सर्वात्मक, विश्वात्मक देवतेला प्रसन्न करेल, हा विश्वास व्यक्त करतो.


तथां सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्म कुसुमांची वीरा।
पूजा केली होय अपारां। तोषालागी ॥

- आचार्य तुषार भोसले
(लेखक भारतीय जनता पक्ष आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)

Powered By Sangraha 9.0