पुण्यात मोठ्या प्रमाणावर सेरो सर्वेक्षण करणार : प्रकाश जावडेकर

05 Sep 2020 17:07:51

prakash javdekar_1 &



पुणे :
पुण्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत असून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यासर्वांचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पुण्यातील विधानभवन येथे बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.



रस्त्यांवर थुंकणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. शहर, जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या, माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्यावरील उपचार आणि निधनानंतर त्यांच्यावरील अंत्यसंस्कारांसाठी झालेला विलंब, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा जम्बो रुग्णालयात झालेला मृत्यू, जम्बो रुग्णालयाबाबत सुरू असलेला गोंधळ याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना जावडेकर म्हणाले, पुण्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच काँटमेन्ट झोनमध्ये अँटिजन टेस्ट वाढविण्यात येणार आहे.



पुढे ते म्हणाले, देशात सर्वात जास्त रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग पुण्यात आहे, ही चिंतेची बाब आहे. पुण्यातील रुग्णदर व रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापन, शासकीय, खाजगी व जम्बो हॉस्पिटलचे प्रभावी व्यवस्थापन याबरोबरच जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचे संदेशपर व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित करावेत, जेणेकरून लोकांमधील भीती कमी होईल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित असून नागरिकांनी समाजात वावरताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांकडून पोलीस विभागाने दंड वसूल करावा, असेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0