'कंगना' वादावर संजय राऊतांचा यु-टर्न!

05 Sep 2020 16:03:38
sanjay raut_1  


कंगनासोबत व्यक्तिगत भांडण नाही : संजय राऊत


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीये. अशातच संजय राऊत यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केले आहे. कंगनासोबत माझे व्यक्तीगत भांडण नाही, पण मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचे कृत्य, हे अत्यंत गंभीर आहे, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो आम्ही आवाज उठवू, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. यावेळी त्यांनी कंगनाला मराठी वाचता बोलता येतं का? असा प्रश्नही विचारला.


कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये, असे वक्तव्य केले होते.


याच विधानानंतर कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचे यात म्हटले आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला.




Powered By Sangraha 9.0