पत्रकाराच्या मृत्यूनंतर पवारांना उपरती म्हणजे राज्य सरकारच्या पापाची कबुली!

05 Sep 2020 16:39:57
sharad pawar_1  



शरद पवारांकडून पुण्याला ६ कार्डियाक रुग्णवाहिका; पत्रकार पांडुरंग रायकरांच्या मृत्युनंतर आमदार अतुल भातखळकरांची शरद पवारांवर टीका! 

मुंबई : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता उभ्या केलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये केवळ कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांना जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ट्रस्टच्या माध्यमातून सहा ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका पालिकेला देण्याचे जाहीर केले. यावर ‘पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कार्डियाक ऍम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे झालेल्या दुर्दैवी निधनानंतर पवारांनाही उपरती होणे म्हणजे राज्य सरकारच्या पापाची कबुली आहे’, असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.


फेसबूक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कितीही आरोग्य यंत्रणा सक्षम असली असा दावा केला असला तरीही अशा प्रकरणांमुळे एका पत्रकाराला व्हेंटीलेटर, रुग्णवाहिका आणि वेळेत उपचारासाठी बेड मिळणे पुण्यासारख्या शहरात कठीण होत असल्याने, हे दावे किती फोल आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.







वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक घेत सविस्तर माहिती घेतली. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अवघ्या तीनच रुग्णवाहिका असल्याची माहिती बैठकीत मिळाल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच येत्या तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस ट्रस्टच्या माध्यमातून सहा ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका पालिकेला देण्याचे जाहीर केले.


पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शरद पवार यांनी पुढाकार घेत स्वतःच सूत्रे हाती घेतली आहेत. पुण्यातील बिघडलेल्या स्थितीला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत? खरोखरीच परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश येत आहे का, यावरून पवार यांनी स्थानिक प्रशासनाला फैलावर घेतले. तसेच कालपासून बैठकांचे सत्रही सुरू केले.


जुन्या-नव्या उपायांवर फारशी चर्चा न करता पुण्यात नेमके काय चालले आहे? सध्याच्या परिस्थितीवर कोणाचे नियंत्रण आहे? खरोखरीच परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न होत आहेत का, हे पवार यांनी विचारले. पुणे शहराच्या ५२ लाख लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ तीनच कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध असून, त्यातील एक बंद आहे. त्याची दखल घेऊन तातडीने सहा कार्डियाक रुग्णवाहिका देणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.







Powered By Sangraha 9.0