लडाखमध्ये एसएफएफ कमांडोंचा थरार

    दिनांक  05-Sep-2020 23:39:33   
|

INDIAN ARMY_1  


एसएफएफच्या प्रशिक्षण आणि इतर सर्वच बाबी या भारतीय सैन्याअंतर्गतच केल्या जातात. एसएफएफचे मुख्य काम होते की, चीनमध्ये जाऊन गुप्त माहिती संकलित करणे, महत्त्वाच्या बातम्या काढणे, गरज पडल्यास तिबेटमधील महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करणे. त्यांना जंगलातील लढाई, डोंगराळ भागातील लढाई, हेलिकॉप्टर्सच्या मदतीने शत्रूवर हल्ला करणे अशा प्रकारचे विविध अत्यंत कठीण कमांडो प्रशिक्षण देण्यात येते. यापूर्वीचे भारतीय सैन्याचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल दलबीर सुहाग हे सैन्यप्रमुख होण्याआधी एसएफएफचे प्रमुख होते.


अतिक्रमणाचा प्रयत्न हाणून पाडला


दि. २९ आणि ३० ऑगस्ट रोजी चीनचा भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला, त्यामध्ये ‘एसएफएफ’चा वापर करण्यात आला होता. १९६२ नंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्याने अत्यंत आक्रमकपणे चीनच्या हद्दीमध्ये जाऊन तिथल्या काही शिखरांवर आपले वर्चस्व स्थापन केले. समाजमाध्यमांवर फिरणार्‍या माहितीनुसार, यामध्ये काही चिनी सैनिकांना या तुकडीने ताब्यात घेतले असावे आणि याच्यातील बहुतांश काम कमांडोजने केले होते. सहसा ‘एसएफएफ’ने केलेली कुठलीही कारवाई फारशी बातम्यांमध्ये प्रसिद्ध केली जात नव्हती. परंतु, यावेळी मात्र सरकारी बातम्यांमधून ही बातमी प्रसारित करण्यात आली. या कारवाईत ‘एसएफएफ’चा वापर झाला, असे स्पष्ट सांगण्यात आले. याचाच अर्थ चीनला एक स्पष्ट संदेश यातून दिला जात आहे की, तिबेटी तुकडीचा वापर चीनविरूद्ध भारत करू शकतो. १९६२च्या युद्धात पराभूत झाल्यानंतर घाबरलेल्या तत्कालीन राजकीय नेतृत्वाने आणि चुकीची माहिती दिलेल्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने एक नवीन ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ (एसएफएफ) तयार करण्याचा निर्णय घेतला. या कमांडो फोर्सकडे जबाबदारी होती की, चीनने भारतावर हल्ला केला तर चीनच्या अंतर्गत भागात जाऊन त्यांच्या वेगवेगळ्या भागात, परिसरात जाऊन कमांडो पद्धतीने हल्ले चढवून त्यांचे आक्रमण थांबवण्यास मदत करणे.


एसएफएफची उभारणी


१९५९ साली तीन लाखांहून अधिक तिबेटी नागरिक दलाई लामांबरोबर भारतामध्ये आले. काही काळ अमेरिकेने खांपा या जमातीला चीन विरुद्ध लढण्यास तिबेटमध्ये पाठवलेही. परंतु, त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर १९६२ साली भारतामध्ये खांपा आणि तिबेटमधील लढाऊ जमातींमधून दहा हजार तरूणांची निवड करून ‘एसएफएफ कमांडो फोर्स’ उभारण्यात आली. देहरादूनपासून १००किलोमीटर दूर चक्राता गावी त्यांचे ट्रेनिंग सेंटर तयार करण्यात आले. आज मोठ्या प्रमाणामध्ये तिबेटी निर्वासित त्या भागात राहात आहेत. त्यांना अतिशय कठीण कमांडो ट्रेनिंग हे भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या अधिकार्‍यांनी दिले. त्यांची संख्या आधी १० ते १२ हजारांमध्ये होती आणि आता ती दहा हजारांहून अधिक असावी. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी/तयार करण्यासाठी अमेरिकेची गुप्तहेर संस्था ‘सीआयए’ची देखील मदत घेण्यात आली. सुरूवातीला या तुकडीला एम-१, एम-२, एम-३ अशा प्रकारच्या आधुनिक बंदुका देण्यात आल्या होत्या. ही तुकडी थेट पंतप्रधानांच्या हाताखालची आहे. त्यांच्यावर असलेले सर्व अधिकारी मात्र भारतीय सैन्य दलातील आहेत. गरजेनुसार भारतीय सैन्य त्यांचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करत असते.


एसएफएफच्या कारवाया प्रकाशझोतातून दूर


त्यांचे प्रशिक्षण आणि इतर सर्वच बाबी या भारतीय सैन्याअंतर्गतच केल्या जातात. एसएफएफचे मुख्य काम होते की, चीनमध्ये जाऊन गुप्त माहिती संकलित करणे, महत्त्वाच्या बातम्या काढणे, गरज पडल्यास तिबेटमधील महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करणे. त्यांना जंगलातील लढाई, डोंगराळ भागातील लढाई, हेलिकॉप्टर्सच्या मदतीने शत्रूवर हल्ला करणे अशा प्रकारचे विविध अत्यंत कठीण कमांडो प्रशिक्षण देण्यात येते. यापूर्वीचे भारतीय सैन्याचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल दलबीर सुहाग हे सैन्यप्रमुख होण्याआधी एसएफएफचे प्रमुख होते. त्यांना हेलिकॉप्टर आणि एअरबॉन्ड प्रशिक्षण आग्र्यामध्ये देण्यात आले. काही कालावधीनंतर सहारनपूर येथे सरसावाला त्यांना पुढील प्रशिक्षण देण्यात आले. १९६० पर्यंत अशा सहा बटालियन उभारण्यात आल्या होत्या. त्यांचे नेतृत्व कर्नल हुद्द्याचे अधिकारी करायचे. अनेक तिबेटी नागरिक अधिकारी म्हणून यामध्ये भरतीही झाले होते. अर्थात, सर्वात जास्त अधिकारी सैन्यातील स्पेशल फोर्सेस आणी पायदळातील असतात. पण, एसएफएफच्या कारवाया या नेहमी प्रकाशझोतातून नेहमीच दूर ठेवण्यात आल्या. सुरूवातीला या तुकडीला भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात आले होते. परंतु, जसजशी भारत-चीन सीमा शांत राहिली, तेव्हा त्यांना इतर लढाईच्या कामांतही सामावून घेत त्यांच्या प्रशिक्षणाचा वापर करण्यात आला. त्यांच्या मदतीला ‘एव्हिएशन रिसर्च सेंटर’ म्हणजे हवाई दलाच्या पायलटने चालवलेली स्पेशल विमानेही अनेक वेळा देण्यात आली.

एसएफएफच्या काही महत्त्वाच्या कारवाया


एसएफएफने भूतकाळात अनेक चांगली ऑपरेशन्स फत्ते केली आहेत. एक शिखर सर करण्याच्या निमित्ताने नंदादेवी मोहिमेत कॅप्टन एम. एस. कोहली यांनी एसएफएफच्या मदतीने एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तिथे बसवले, जे चीनमध्ये चाललेल्या आण्विक चाचण्यांवर लक्ष ठेवून होते. १९६७ साली चीन विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करत होताच. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिकच्या मदतीने आणि स्पाय सॅटेलाईटच्या मदतीने लक्ष ठेवण्यात आले होते.


बांगलादेशमधील ‘ऑपरेशन ईगल’


१९७१च्या पाकिस्तान विरुद्धच्या बांगलादेश मुक्तीच्या लढाईमध्ये एसएफएफचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यात आला होता. तीन एसएफएफच्या तुकड्यांचा वापर चितगाँगमध्ये करण्यात आला होता, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याला पराभूत करण्यात आपल्याला यश मिळाले. या कारवाईला ‘ऑपरेशन ईगल’ असे म्हटले जाते. त्यामध्ये एक ब्रिगेडियर हुद्द्याच्या तिबेटियन अधिकार्‍याने या फोर्सचे नेतृत्व केले होते. लढाई सुरू होण्याआधी एसएफएफना कमांडो हल्ल्याच्या मदतीने बांगलादेशमधील काही पूल, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्यास सांगण्यात आले होते. हे काम अत्यंत कौशल्याने त्यांनी पार पाडले. त्याच्यानंतर चितगाँगवर हल्ला करण्याचे कामसुद्धा देण्यात येणार होते. परंतु, त्यांच्याकडे तोफखाना आणि इतर मोठी शस्त्रास्त्रे नसल्याने ते काम या तुकडीकडे सोपवण्यात आले नाही. पाकिस्तानला हरवण्यामध्ये एसएफएफने एक महत्त्वाची जबाबादारी पार पाडली होती. त्यामध्ये त्यांच्या ५६ हून अधिक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि १९०सैनिक जखमी झाले होते. चितगाँग हिलवर त्यांचे नियंत्रण असल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा बांगलादेशमधून म्यानमारमध्ये पळून जायचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला होता. याकरिता त्यांना अनेक शूरता पुरस्कार प्रदान करुन सन्मानितही करण्यात आले.

पंजाबमधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये सुवर्ण मंदिरावर केलेल्या हल्ल्यामध्ये अकाल तख्तमधून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी एसएफएफचा वापर केला गेला होता. १९८४ नंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी काही कालावधीसाठी एसएफएफकडे सुपूर्द करण्यात आली होती. नंतर अर्थातच ‘एसपीजी’ अर्थात ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’कडे ती जबाबदारी वर्ग करण्यात आली. या नंतरच्या काळामध्ये काश्मीरमध्ये काही वेळा एसएफएफच्या कमांडोजचा वापर करण्यात आला. चीनची सीमा शांत राहिल्यामुळे हळूहळू त्यांचा वापर चीनच्या सीमेवर कमी होत गेला. एसएफएफमध्ये भरती झालेले तरूण तिबेटियन होते. त्यामुळे साहजिकच त्यांना तिबेटविषयी खूप माहिती होती. आता मात्र अनेक वर्षांनतर एसएफएफमध्ये भरती होणारे तरूण हे भारतात जन्माला आलेले आणि इथेच मोठे झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा तिबेटमधील जनतेशी असलेला संबंध हा कमी आहे. परंतु, आता पुन्हा एकदा एसएफएफचा वापर चीनच्या विरोधात केल्याने त्यांची कामगिरी देशासमोर आली आहे.


चीनला एक महत्त्वाचा संदेश


चीन तिबेटमध्ये लढण्यासाठी चीनमध्ये असलेल्या तिबेटी तरूणांना भरती करत आहे. कारण, तिबेटच्या उच्च स्थानांवर म्हणजे १५-१६ हजार फुटांच्या उंचीवरती चिनी सैनिकांना तिथे राहाणे कठीण जात असल्याने स्थानिक परिसरातील तरूणांना सैन्यात भरती केल्यास त्यांची कामगिरी चांगली होऊ शकते. मध्यंतरी अशीही बातमी होती की, चीन नेपाळमधील गोरखा वंशियांना चिनी सैन्यात भरती करण्याच्या प्रयत्नात आहे. नेपाळच्या गोरखांना सैन्यात सामील करण्याचे प्रमुख कारण म्हणजे, ते मुळातच नेपाळच्या उंच प्रदेशात वस्तीला असल्याने या भागात लढण्याची त्यांची क्षमता नेहमीच चांगली आहे. ‘स्पेशलाईझ्ड फोर्सेस’चा नियमित वापर न केल्यास त्यांच्या क्षमता वाया जाण्याची भीती असते. म्हणून सध्याच्या २९-३०ऑगस्टच्या हल्ल्यामध्ये त्यांचा केलेला वापर हे निश्चितच महत्त्वाचे पाऊल आहे. त्यातून चीनला एक महत्त्वाचा संदेश यामधून देण्यात आला आहे. चिनी सैन्याशी लढण्यासाठी एसएफएफचा उपयोग महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे आपली चीनची विरोधात लढण्याची क्षमता निश्चितच वाढणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.