कोरोनाने घेतला १०७ सफाई कामगारांचा बळी!

    दिनांक  05-Sep-2020 16:58:43
|
Cleaning workers_1 &


कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत!


मुंबई : कोरोना विरोधात लढा देत असताना पालिकेच्या विविध विभागांतील १३२ अधिकारी व कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यापैकी १०७ सफाई कामगार आहेत. त्यांचे कुटुंबीय अद्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.


कोरोना विरोधातल्या लढाईत एकूण २५८८ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १३२ जण दगावले. यामध्ये साहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अधिकारी या दर्जाच्या ७४ जणांना बाधा झाली. त्यापैकी ३ जण दगावले. क्लार्क दर्जाच्या ४४५ जणांना बाधा झाली. त्यापैकी २ दगावले, तृतीय श्रेणीच्या ६४१ जणांना बाधा झाली होती. त्यापैकी २० जण दगावले, तर चतुर्थ श्रेणी १४२८ सफाई कामगारांना बाधा पोहोचून त्यापैकी १०७ जण दगावले. या सर्वांपैकी फक्त ६ जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे उर्वरित शहीद कामगारांच्या कुटुंबियांना पालिकेकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षाच आहे.


कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये १,४२८ सफाई कामगार असून त्यांच्यातील १०७ सफाई कामगारांचा मृत्यू झाला. ते अजूनही आर्थिक मदतीपासून वंचित आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास शहीद कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. परंतु आजपर्यंत शहीद कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली नसून ६ मृत कामगारांच्या कुटुंबियांना विमा संरक्षणाचे प्रत्येकी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. परंतु त्यानंतर पालिकेकडून कुठलीच आर्थिक मदत करण्यात आलेली नाही.


कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याने त्यांचे क्लेम कुटुंबियांना मिळेपर्यंत कुटुंबियांना दर महिना मृत कामगारांच्या पगारापैकी ठराविक रक्कम द्यावी, जेणे करुन कुटुंबांचा घरखर्च भागेल. तसेच शहीद कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला वारसा हक्काद्वारे पालिका सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पालन करावे, अशी मागणी पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे केल्याचे म्युनिसिपल मजदुर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.