सुशांत आत्महत्या प्रकरण ; सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती एनसीबीच्या ताब्यात

04 Sep 2020 10:42:12

SSR_1  H x W: 0
 
मुंबई : शुक्रवारी सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक मोठ्या घडामोडी सकाळपासून घडत आहेत. एकीकडे एनसीबीने सुशांत सिंह राजपूतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना ताब्यात घेतले. ड्रग्स कनेक्शन प्रकरणात एनसीबीने सकाळपासूनच सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. एनसीबीच्या महिला अधिकाऱ्यांची रियाच्या घराबाहेरची उपस्थिती ही तिच्या अटकेचे संकेत देतात. त्यामुळे आता रिया आणि शोविक चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
 
 
 
सुशांतसिंगचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची तब्बल अडीच तास चौकशी केली गेली. आता शोविक आणि सॅम्युअलची एकत्रित चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. एनसीबीची टीम सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली होती. एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसेच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0