Appबंदीमुळे चीन भावूक? करून दिली भारत-चीन संबंधांची आठवण

04 Sep 2020 15:51:35

Xi Jingping_1  
 


नवी दिल्ली : मोदी सरकारद्वारे चीनच्या एकूण ११८ अॅप्सवर बंदी आणत पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक करण्यात आला. मात्र, या कठीण प्रसंगात आता चीनला हिंदी चीनी भाई भाईचा नारा आठवू लागला आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, योगासन, आमिर खानचा चित्रपट दंगल, अशा आठवणी ताज्या करत चीनने इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक वक्तव्य जाहीर केले आहे. भारताने अमेरिकेच्या इशाऱ्यामुळे अॅप्सवर बंदी आणली आहे, असे मत व्यक्त केले आहे. भारताचे आणि चीनचे संबंध हजार वर्षांपूर्वीपासून आहेत. आपल्या देशांतील नागरिकांना एकत्र येण्याची गरज आहे, असे चीनने म्हटले आहे.
 
 
अॅप बंद झाल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रीया
 
 
भारतातर्फे बंद करण्यात आलेल्या ११८ चीनी अॅप्सवर चीनी वाणिज्य मंत्रालयाने एक प्रतिक्रीया दिली होती. गाओ फेंग या प्रवक्त्यांनी याबद्दल एक वक्तव्य केले होते. "भारताने चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केली आहे. हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन आहे. भारताने ही चूक सुधारायला हवी. दोन्ही देशांमध्ये सकारात्मक वातावरण असणे गरजेचे आहे. या बंदीमुळे दोन्ही देशांना नुकसान होणार आहे."
 
 
दुसरी प्रतिक्रीया
 
भारताने केलेल्या अॅबबंदीनंतर चीनकडून दुसऱ्यांदा प्रतिक्रीया जाहीर करण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चुनियांग यांनी एका भाषणात या अॅपबंदीचा उल्लेख केला आहे. एकीकडे बॅन आणल्यानंतर भारत आपल्या देशवासीयांना नुकसान पोहोचवत आहे. तसेच दुसरीकडे आपल्या कंपन्यांनाही नुकसान होत आहे. आम्हाला आश्चर्य वाटत आहे की, चीनने या अॅप्सवर बंदी घालण्याची मागणी केली होती. अमेरिकेने दुसऱ्या देशांनाही याबद्दल तशीच कार्यवाही करण्यास सांगितले. भारत आणि अमेरिका या मुद्द्यावर एकत्र आहेत का ?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
 
भारत चीन संबंध
 
 
चुनियांग म्हणाले, "सर्वांना लक्षात ठेवायला हवे की, भारत आणि आपले जवळचे आणि ऐतिहासिक संबंध आहेत. भारत आणि चीन प्राचीन सभ्यता असलेला देश आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. थोड्याश्या फायद्यासाठी भविष्यातील संधींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण शेजारी राष्ट्र आहोत, रविंद्रनाथ टागोर चीनमध्ये प्रसिद्ध आहेत. चीनमध्ये योग आणि दंगल चित्रपटही प्रसिद्ध आहेत. भारत आमच्यासाठी कधी संकट बनेल, अशी शक्यताही आम्हाला कधी वाटली नाही."
 
 
 
 
चीनविरोधातील भारताने उघडलेली मोहीम चीनी कंपन्यांच्या जिव्हारी लागल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य चीनच्या अधिकृत व्यक्तीकडून येऊ लागले आहे. जूनमध्ये चीनतर्फे गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. त्यावेळी भारताचे २० जवान हुतात्मा झाले. भारतीय जवानांनीही चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. परिणामी चीनचे ३० हून अधिक सैन्य मारले गेले. मात्र, त्यांच्याकडून अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या वादानंतरही चीनने गलवान खोऱ्यातील आपल्या संशयास्पद हालचाली सुरूच ठेवल्या होत्या.
 
 
 
टीकटॉक-पब्जी बंद
 
चीनी अॅप्सवर भारताने दुसऱ्यांदा डिजिटल स्ट्राईक केला आहे. यापूर्वी टीकटॉकसह एकूण ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता पब्जीसह अन्य ११८ अॅप्स बंद करण्यात आले आहेत. भारतात पब्जी खेळणाऱ्यांची संख्या एकूण युझर्सच्या एक चतुर्थांश इतकी असल्याने मोठा व्यावसायाचा वाटा चीनी कंपन्यांनी गमावला आहे. परिणामी चीन भारताविरोधात मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात करत आहे.



Powered By Sangraha 9.0