अनलॉक ५मध्ये बार आणि हॉटेल्सना अटींसह परवानगी

30 Sep 2020 20:29:04

Hotels_1  H x W
 
मुंबई : महाराष्ट्र सरकारने अनलॉक ५ची नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
 
 
प्रवाशांची वाढती मागणी आणि कोरोन मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने मुंबईतील डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात अर्थात एमएमआर विभागात डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे.
 
 
मुंबईतील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गुरुवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळून चित्रपटगृहे सुरू करण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल. त्यामुळे गुरुवारी याबद्दल सकारात्मक निर्णय होऊ शकतो. तसेच दुसरीकडे शाळा, महाविद्यालये हे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्वीमिंग पूल, जिम आणि मेट्रोदेखील बंदच राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, अनलॉक ५ही धार्मिक स्थळे ही बंद राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0