बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नव्या पाहुण्यांचे आगमन; प्रजनन प्रकल्पास चालना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2020   
Total Views |

वाघाटी _1  H x


उसाच्या शेतात ही पिल्ले बेवारस अवस्थेत सापडली 


मुंबई (अक्षय मांडवकर) - पुण्याहून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) 'वाघाटी'च्या (रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्लांना दाखल करण्यात आले आहे. पुण्यात उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या या पिल्लांचे संगोपन आता राष्ट्रीय उद्यानात केले जाईल. दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या या प्रजातीच्या वाढीसाठी उद्यानातर्फे 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही पिल्ले याठिकाणी आणण्यात आली असून त्यांच्या आगमनाने प्रजनन प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे.



वाघाटी _1  H x


 

मार्जार कुळात समावेश असणाऱ्या 'वाघाटी'ला जंगलातील सर्वात लहान आकाराचे मांजर म्हणून ओळखले जाते. या प्रजातीच्या वाढीकरिता २०१३ पासून नॅशनल पार्क प्रशासनाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत 'वाघाटी'चा पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न केला जात आहे. अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच आणि जगातील दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आता दोन 'वाघाटी' दाखल झाल्या आहेत. पुण्यातील दौंड तालुक्यात २८ आॅगस्ट रोजी उसाच्या शेतात वाघाटाची दोन पिल्ले (नर-मादी) बेवारस अवस्थेत सापडली होती. येथील वन विभागाचे अधिकारी आणि 'रेस्क्यू' नामक वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पिल्लांचा त्यांच्या आईशी पुनर्भेटीचा प्रयत्न केला. त्यासाठी पिल्लांना दोन दिवस सापडलेल्या ठिकाणीच ठेवून त्यांची आई येण्याची वाट पाहण्यात आली. मात्र, आई न आल्याने या पिल्लांना मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 
(प्रजनन प्रकल्पाविषयी) 
 
१ सप्टेंबर रोजी ही पिल्ले आमच्या ताब्यात आली असून ती महिन्याभरापेक्षा कमी वयाची असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी दिली. सध्या त्यांचे वजन २५० ग्रॅम आहे. पिल्ले खूपच लहान असल्याने अशा पिल्लांना वाढवणे खूप आव्हानात्मक काम असल्याचे त्यांनी सांगितले. डाॅ. पेठे यांच्या वैद्यकीय मार्गदर्शनाअंतर्गत राष्ट्रीय उद्यानाच्या 'वन्य़जीव बचाव पथका'चे कर्मचारी या पिल्लांच्या संगोपनाचे काम करत आहेत. पिल्लांच्या आगमनाने उद्यानातील 'वाघाटी प्रजनन प्रकल्पा'ला चालना मिळणार आहे. २०१३ साली सुरू करण्यात आलेल्या या प्रजनन प्रकल्पामध्ये गेल्या आठ वर्षात एकदाच प्रजनन झाले आहे. सध्या या प्रजनन प्रकल्पात ११ वर्षांचा नर वाघाटी आणि डिसेंबर, २०१८ मध्ये पुण्यातील मावळहून दाखल झालेल्या साधारण दीड वर्षांच्या नर-मादी अशा दोन वाघाटींचा समावेश आहे. त्यामुळे नव्याने दाखल झालेली पिल्ले पुढील दोन वर्षांत प्रजननक्षम झाल्यानंतर प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
 


राष्ट्रीय उद्यानात पिंजराबंद अधिवासातील 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे. भविष्यात दौंडहून आणलेल्या पिल्लांचा या प्रजनन प्रकल्पात समावेश करण्यात येईल. युनाइटेड किंडम येथील वन्यजीव तज्ज्ञ नेव्हिले बुक यांनी दिलेल्या सल्लांप्रमाणे प्रजनन प्रकल्पासाठी नवीन पिंजरे उभारण्याचे काम सुरू आहे. - जी. मल्लिकार्जुन, वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

 
 
 

मांजराची वैशिष्टय़े

* जंगलातील सर्वात लहान मांजराची प्रजात

* मांसभक्षी असून हा प्राणी निशाचर आहे.

* १४ ते १७ इंच रुंद असून सुमारे दीड किलो वजन

* ७० दिवसांचा प्रजननाचा कालावधी

@@AUTHORINFO_V1@@