मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे, हा त्यांचा प्रश्न : संजय राऊत

03 Sep 2020 13:45:04

sanjay raut_1  


मुंबई :
राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत आहे. पूर्व विदर्भात पूरस्थितीमुळे परिस्थिती गंभीर आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडण्यास तयार नाही, अशी टीका विरोधक वारंवार करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी मातोश्री मधून बाहेर पडत राज्यभरात दौरे करावे अशी मागणी विरोधक करत आहे.  यावर प्रत्युत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. काम होण्याशी मतलब आहे. ‘डिजिटल इंडिया’ वापरुन पीएम काम करतात, तसंच सीएमही काम करत आहेत. असे वक्तव्य करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठराखण केली.




“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच आहे. पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग मुख्यमंत्र्यांनी हा प्रोटोकॉल का तोडावा?” असा सवाल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. तसेच राज्यातील मंदिर कधी उघडण्यात येतील याबाबत भाष्य करताना ते म्हणाले, "लॉकडाऊनची भूमिका केंद्र सरकारची आहे. सरकारला काय हौस नाही हे बंद करायची. मंदिरांचे एक अर्थशास्त्र आहे. मंदिरे खुले करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भूमिका आहे. योग्य वेळी ते निर्णय घेतील. लोकांच्या जीविताशी खेळलं जावू नये, रस्त्यावर उतरुन हे संकट वाढवू नये."




यावेळी त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावरदेखील निशाणा साधला. "अपघात म्हणून निवडून आलेल्या औरंगाबाद खासदारांनी भान ठेवणं गरजेचं आहे. विरोधकांनी संयम ठेवावा, टोकाची भूमिका घेऊ नये” असा इशारा मंदिर-मशिदी उघडण्यासाठी आंदोलन करणारे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजपला संजय राऊत यांनी दिला. यावेळी राज्यातील बदली सत्राविषयी बोलताना,सरकार बदलल्यावर बदल्या करु नयेत, असं लिहून ठेवलंय का? त्यांच्या काळात झाल्या नव्हत्या का बदल्या? राज्यहितासाठी बदल्या केल्या आहेत” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0