कारगील विजयाचा ‘दीप’ नायक

29 Sep 2020 21:34:53


Nayak Dipchand_1 &nb

 

 



सैनिकांच्या आत्मसन्मानाचा आग्रह धरणारे, कारगील युद्धात महत्त्वाचे योगदान देणार्‍या नायक दीपचंद यांची शौर्यगाथा....

 

 
 

संघटित प्रयत्न आणि भारतीय जवानांचे शौर्य यासाठी कारगील युद्ध हे भारतीयांच्या चिरकाल स्मरणात राहणारे आहे. मागील अनेक वर्षांपासून नाशिक जवळील देवळाली येथे वास्तव्यास असणारे व मूळचे पंचग्रामी गाव, पाबडा, हरियाणा येथील आर्टिलरीचे तोपची नायक दीपचंद यांचे या युद्धातील योगदान दखलपात्र आहे. योद्धा म्हणून त्यांनी गाजविलेले कर्तव्य हे जसे कौतुकास पात्र आहे. तसेच, सध्या दोन पाय, एक हात गमावून ते जगत असलेले आयुष्यदेखील तितकेच प्रेरणादायी आहे. 

 
एकूण सहा भावंडं असलेले दीपचंद १९९४ मध्ये नाशिक येथे आर्टिलरीमध्ये भरती झाले. लहानपणापासून आजोबा धरमचंद नंबरदार यांनी शेतीकाम करत असतानाच आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचे संस्कार दीपचंद यांच्यावर केले. त्यातच गावाच्या आकाशातून उडणारी हवाई दलाची विमाने हे दीपचंद यांच्या बालमनावर गारूड करत होतीच. ही सर्व शिदोरी घेऊन ते मातृभूमीचे ऋण चुकविण्याकामी भारतीय सैन्यात दाखल झाले.
 
सैन्यभरतीच्या निमित्ताने दीपचंद यांनी पहिल्यांदा आपले गाव सोडले. या गावातून केवळ एक ते दोन सैनिक आजवर भरती झाले होते. त्यामुळे गावकर्‍यांच्या मनात भीती दाटून आली. भरतीनंतरच्या प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी पोटदुखीने दीपचंद हैराण झाले. पहिल्याच दिवशी ही गत तर पुढे प्रशिक्षण आपण कसे करणार, हा प्रश्न त्यांच्या मनात यामुळे निर्माण झाला. मात्र, नेटाने त्यांनी सर्व प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर दीपचंद यांची पहिली पोस्टिंग हुसेनीवाला बोर्ड, पंजाब येथे झाली. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन रक्षक’, जम्मू-काश्मीरमध्ये सहभाग घेतला. उरी सेक्टरमध्ये बारामुल्ला येथे त्यांचे पोस्टिंग केले गेले. तेथेही त्यांनी आपले शौर्य गाजवले.

 


 
दीपचंद यांच्या अंगी असलेल्या गुणांची पारख एव्हाना भारतीय सैन्याला झाली होती. त्यामुळे काश्मिरी भाषेच्या कोर्ससाठी त्यांची निवड करण्यात आली. दोन महिन्यांत त्यांनी काश्मिरी भाषा अवगत केली. त्यानंतर त्यांची नियुक्ती रेजिमेंटच्या गुप्तहेर खात्यात करण्यात आली. यावेळी त्यांनी काश्मिरी जनतेत मिसळत शिताफीने अतिरेक्यांची माहिती गोळा केली. ज्यामुळे काश्मीर खोर्‍यात सेना आपले ऑपरेशन राबवू शकली. दीपचंद यांच्या संकलित माहितीच्या आधारावर दरगाव मोहल्ला हुडचक येथील कार्यवाहीत सिव्हिल बसमध्ये सैन्य दाखल झाले. तेव्हा गाडीखाली लपलेले तीन कुविख्यात अतिरेकी मारण्यात सैन्याला यश आले. दीपचंद यांनी आपल्या काश्मीर खोर्‍यातील दीड वर्षांच्या कालावधीत सहा ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवत आठ ते दहा अतिरेक्यांना कंठस्नान घातले. 

 


 
काश्मीर खोर्‍यात सैन्य आपली कार्यवाही करत असतानाच ‘कारगील युद्ध’ सुरू झाले आणि त्यामुळे एक सैनिक जी मनीषा उरी बाळगून सैन्यात दाखल होत असतो, तो क्षण दीपचंद यांच्या जीवनात आला. त्यांच्या युनिटला ‘Move to Kargil’ असा संदेश प्राप्त झाला. हा संदेश ऐकताच प्रचंड आनंद, अंगावर रोमांच आणि मनात अभिमान दाटून आल्याचे दीपचंद आवर्जून नमूद करतात. आजही दिव्यांग असतानादेखील ते ‘Move to Galwan Ghati’ या संदेशाची वाट पाहत आहेत, हे विशेष. आईचे कर्ज चुकवू शकतो, मातृभूमीचे कर्ज चुकवू शकत नाही, ही भावना त्यांच्या ठायी ओतप्रोत भरलेली आहे. 
 

कारगील युद्धात त्यांना राऊंड टोलोलिंगवरच हल्ला करण्याची पहिली संधी मिळाली. पहिलाच तोफगोळा योग्य ठिकाणी पडल्याने दीपचंद यांनी वापरलेला डाटा त्यानंतर सर्व आर्टलरीला देण्यात आला. या कामगिरीमुळे त्यांच्या बटालियनचे कौतुक झाले व भारताने टोलोलिंग जिंकले. पुढे १३ जम्मू-काश्मीर रायफल’, ‘१८ ग्रेनेडिअर’, ‘२ राजपुताना रायफलआदींना या युद्धात दीपचंद यांचे व त्यांच्या युनिटचे मोलाचे सहकार्य लाभले.

 


या युद्धात त्यांनी आठ जागांवर गन पोझिशन बदलली. केवळ कॉटन कपडे, साधे बूट यावरच लढाई केली. या लढाईदरम्यान दहा हजार राऊंड फायर केले गेले, तर ११ ‘ग्यालेंत्री अ‍ॅवॉर्ड’ मिळाले. ‘कारगील’ नावाने युनिटचा सन्मान झाला. संसद हल्ल्यावेळी दीपचंद हे राजस्थान सीमेवर तैनात होते. यावेळी दारूगोळा लावत असताना स्फोट झाला व त्यात त्यांचे हात-पाय निकामी झाले. त्यावेळी दीड वर्षाचा मुलगा व तीन महिने गर्भावस्था असणारी पत्नी अशी त्यांच्या कुटुंबाची स्थिती होती. आजही त्यांच्या पत्नीची त्यांना उत्तम साथ लाभत आहे. कारगील युद्धातील कामगिरीमुळे माजी जनरल बिपीन रावत हेदेखील त्यांचा विशेष गौरव करतात. युद्धात शौर्य गाजविणारा सैनिक चुकीने झालेल्या स्फोटात विकलांग झाला. मात्र, राष्ट्रासाठी आपण लढलो, याचे समाधान दीपचंद यांच्या चेहर्‍यावर पाहावयास मिळते. सैनिकांप्रति केवळ ते हुतात्मा झाल्यावरच देशभक्ती उफाळून न येता ती कायम असावी, अशी मनीषा ते बोलून दाखवितात. त्यांच्या धैर्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम.

 

 
Powered By Sangraha 9.0