पौष्टिक अन् पाचक चटण्या आणि कोशिंबिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |

 


Koshimbir_1  H

 


 


आपल्या विचारांचा आजूबाजूच्या परिस्थितीचा सगळ्या गोष्टींचा आपल्यावर आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. शरीरामध्ये साचलेल्या अनेक गोष्टींचा निचरा होणे आवश्यक असते. कारण, या गोष्टीच आपल्या आजारपणास कारणीभूत असतात. जसे शरीरात साठलेल्या किंवा वाढ झालेल्या आवश्यक नसलेल्या पेशी या कर्करोगासारख्या आजाराला आमंत्रण देऊ शकतात, तसेच अनेक वर्षांपासून साठलेले विचार त्यांना वाट मोकळी करून दिली नाही, तर रक्तामध्ये गुठळ्या निर्माण करु शकतात. जेव्हा आपल्याला खूप राग येतो, तेव्हा आपला रक्तप्रवाह जलदगतीने होतो. याउलट भीती वाटते तेव्हा रक्त गोठत म्हणजे प्रवाह धीम्या गतीने होतो आणि दोन्ही वेळा नसा संकुचित होतात. वेळोवेळी आपल्या भावनांना मोकळे करणे खूप आवश्यक आहे. साठून राहिलेल्या भावना या मनासाठी जशा त्रासदायक असतात, तशाच त्या शरीरासही त्रास देणार्‍या असतात. आपण आज हे अनुभवत आहोत. हे सगळे ताण आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांवर दुष्परिणाम करत असतात. म्हणून निसर्गोपचारात आहाराला महत्त्व दिले गेले आहे. आहार संतुलित असेल त्रासदायक नसेल तर मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते. आपल्याकडे प्रांतानुरुप केल्या जाणार्‍या फक्त चटण्या आणि कोशिंबिरी पाहिल्या तर त्यात विविधता दिसते, पण ज्या प्रदेशात जे धान्य पिकते तिथे सहजच पचते. जसे सोलापूर किंवा जळगावमध्ये शेंगदाण्यावर भर असतो. कारण, तिथे त्याचे उत्पादन होते. परंतु, हे प्रदेश कोरडे आहेत. त्यांना स्निग्धतेची आवश्यकता असते. त्यामुळे शेंगदाणे, तीळ यांचा आहारात समावेश असतो. तेच कोकण आणि तत्सम प्रदेशात नारळावर भर जास्त असतो, तसेच आमसूल, आंबोशी वापरायची पद्धत आहे. त्या त्या प्रदेशानुरुप शरीराची ती गरज आहे.

 

 


भाज्या चिरताना त्यामधील जीवनसत्त्व नष्ट होतात. मात्र तेच कोथिंबीर, कैरी, चिंच, पुदिना, लसणाची पात, ओलं खोबर इत्यादींच्या चटण्यांतून आपल्याला ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळतं. खोबर्‍यामुळे मांसपेशी सुदृढ होतात, भूक वाढते. अन्न पचायला मदत होते. कोथिंबीर आणि पुदिना यामुळे भूक वाढवण्यास आणि पाचक रस निर्माण करण्यास मदत होते. कोथिंबीर ही शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर काढून टाकण्यास तसेच किडनीची सफाई करण्यासाठी ही उपयुक्त आहे. चटण्यांमध्ये गूळ घातला तर त्यातून आपल्या शरीराला लोह मिळते. शेंगदाणे, तीळ, खोबरं, जवस या तेलबियांपासून शरीराला खनिज तसेच जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो. चटण्यांमध्ये असलेली लसूण कफ कमी करून खोकला, दमा यांसारख्या आजारावर नियंत्रण मिळविण्यास मदत करते. आवळा, कडिपत्ता या पदार्थामुळे आपले केस छान मऊ आणि काळेभोर होण्यासाठी या तेलांचा उपयोग होतो. चटण्यांप्रमाणे विविध प्रकारच्या कोशिंबिरी ही पोषक घटक देतात. दही आणि कांदा ज्यांना मूळव्याधीतून रक्त पडत असेल त्यांच्यासाठी उत्तम उपाय आहे. शरीरातील लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी बीट, गाजर, पालक, मेथी छान काम करतात. मुळा वायूचा नाश करतो. कोबीतर बहुगुणी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शरीर बांधेसूद होण्यासाठी रोज १०० ग्रॅम कोबी खावा. कोणत्याही दुखण्यात दुःख थांबवण्यास मदत करतो. सूज आली असेल तर कोबीचे पान बांधल्याने कमी होते. पानांची वाफ कफाचा नाश करण्यासाठी मदत करते.

 


थोडक्यात जेवणाची रंगत वाढवणार्‍या या घटकांमुळे पोषक तत्त्व मिळतात. रोज कच्च्या स्वरुपात आपण यांचे सेवन केले तर रक्त, मांस, धातू, मज्जा यांना पोषक तत्त्व मिळतात. तसेच यांमध्ये असणार्‍या रेषांमुळे (फायबर) मल बांधून येण्यास मदत होते. मला आपल्या संस्कृतीच नेहमीच कौतुक वाटतं. इतका सढळ हाताने आपल्याला आपल्या पूर्वजांनी अनमोल ठेवा दिला आहे जो आरोग्य उत्तम ठेवण्यास कायम मदत करतो. बघायला गेलं तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यातून मिळणारी शिकवण ही अमूल्य आहे. आपल्या परंपरा आणि आहार हा खूप मोठा विषय आहे. न संपणारा अभ्यास करावा तितका कमी आहे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते विज्ञानाशी कसं निगडित आहे, हे अभ्यास केल्यानंतरच कळेल. हा ठेवा आपोआपच आपल्याला चैतन्य, आनंद देतो. औषधाची आवश्यकताच नाही आपण जर याचा नीट समजून उपयोग केला तर... प्रत्येक गोष्टीत दडलेल्या सौंदर्यामागे खूप मोठे ज्ञान (विज्ञान) असलेले दिसेल. ते खरचं अभ्यासण्यासारखं आहे. लहानपणी मी बर्‍याच वेळा ऐकलं आहे की, आजारी असताना काही खाऊ नये आणि कष्टाशिवाय राहू नये. कारण, आजारपणात पचनक्रिया मंदावते म्हणून खाऊ नये आणि आजारी पडूच नये, यासाठी कष्टाशिवाय राहू नये. आज आपण बघतोय बैठे काम करणार्‍या व्यक्तींमध्ये स्थूलतेचे प्रमाण अधिक दिसून येते. तसेच अन्नपचनाचा त्रासही दिसून येतो. पोट साफ न होणे ही आज खूप मोठी समस्या बहुतांश व्यक्तींमध्ये ही आढळून येते, त्याची कारणे अनेक आहेत. ती आपण पुढच्या लेखात पाहू.
 
 

 

- सीता भिडे

 

@@AUTHORINFO_V1@@