'सर्व समाजासाठी आरक्षण रद्द करा अन्...'

27 Sep 2020 17:53:25

udayanraje bhosale _1&nbs



सातारा :
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाजात संतप्त भावना निर्माण झाली आहे. राज्य सरकार कोर्टात बाजू मांडण्यासाठी कमी पडले असा आरोप होत आहे. तर मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. यातच ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतला त्यावरही मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.



अशातच आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठे विधान केले. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि मेरिटनुसार आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत उदयनराजे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतात, प्रत्येकाला देवाने बुद्धी दिली आहे. मेरिटवर आरक्षण द्यावं, सगळेच आरक्षण रद्द करावे, ज्याने कष्टच घेतले नाही त्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळतो, आणि ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, तीन ऑक्टोबर रोजी पुण्यात विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात दिली. यावेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्याबरोबर विनायक मेटे यांनी सविस्तर चर्चा केली. याभेटीनंतर विनायक मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी आज ही भेट घेतली. त्यांना मराठा विचारमंथन बैठकीचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा समाजाला या बैठकीत दिशा देण्याचे काम त्यांनी करावे, असे आवाहन केले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी होकार दिला.खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मराठा समाजाने कधीही कुणाचे आरक्षण मागितले नसून स्वतः च्या हक्काच्या आरक्षणाची मागणी केली आहे. पुण्यातील बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे. नेतृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्वाचे आहे. या प्रश्नांची दखल कुणी घेतली नाही तर उद्रेक होईल, याला जवाबदार कोण? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.
Powered By Sangraha 9.0