‘इसिस’ आणि अंतर्गत सुरक्षा

    दिनांक  26-Sep-2020 20:42:10   
|

isis_1  H x W:


‘इसिस’च्या संकटांच्या संदर्भात प्रचंड जनजागृती करीत राहिली पाहिजे. कारण, ‘इसिस’चे तत्त्वज्ञान लोकांना जीवंत राहण्याचा अधिकार नाकारते. मानवी स्वातंत्र्याला इथे काही किंमत नाही. स्त्री स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. मूर्तिपूजा त्यांना मान्य नाही, ‘कुराण’ सोडून अन्य धर्मग्रंथ त्यांना मान्य नाहीत. अनेकता, बहुविधता त्यांना मान्य नाही. प्रेषिताच्या काळातील शुद्ध इस्लाम जगात आणला पाहिजे आणि जेथे जेथे मुसलमान आहेत त्यांनी शुद्ध इस्लामचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी त्यांची शिकवणूक आहे.


इस्लामिक दहशतवाद्यांच्या गेल्या काही दिवसांच्या बातम्या पुढीलप्रमाणे आहेत. २२ ऑगस्टला दिल्ली इथे ‘इसिस’चा दहशतवादी अबू युसूफ याला अटक करण्यात आली. दोन प्रेशर कुकरमध्ये ठेवलेली १५ किलोग्रॅम स्फोटके पोलिसांनी जप्त केली. अबू युसूफ उत्तर प्रदेश येथील बलरामपूर येथील रहिवासी आहे. दिल्लीमध्ये दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची त्याची योजना होती. भारतातून पळून गेलेल्या झाकीर नाईक याच्या प्रवचनांचा त्याच्यावर फार मोठा प्रभाव पडला आणि तो ‘इसिस’मध्ये दाखल झाला. दुसरी बातमी ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ अर्थात ‘एनआयए’ने पश्चिम बंगाल, केरळ या ठिकाणाहून नऊ इस्लामी दहशतवाद्यांना अटक केली. एकट्या मुर्शिदाबाद, प. बंगाल एर्नाकुलम, केरळ, या ठिकाणी छापे मारून अनेक प्रकारची स्फोटके, आत्मघातकी पट्टे, जाकिटे, जप्त केली आहेत. ११ सप्टेंबर रोजी या सर्वांवर खटलेही दखल करण्यात आले आहेत. १८ सप्टेंबर रोजी संसदेच्या पावसाळी सत्रात लोकसभेत ‘एनआयए’च्या कारवायांची माहिती घेण्यात आली. तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, या राज्यांत ‘इसिस’चे दहशतवादी अड्डे निर्माण झाले आहेत.केंद्रीय गृहखात्याने माहिती देताना सांगितले की, १२२ कथित दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये इस्लामी दहशतवादी अड्ड्यांचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे. मुस्लीम तरुणांना आगलावू भाषणे ऐकवून इस्लामी दहशतवादी बनविण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून चालू आहे. गुप्तचर यंत्रणांना याची माहिती असते. तामिळनाडू आणि केरळ येथील राज्यकर्ते मुस्लीम तुष्टीकरणाच्या मागे लागले असल्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या सूचनांकडे लक्ष देत नाहीत. तामिळनाडूतून अझर फकरुद्दीन या नावाचा मुस्लीम तरुण ‘इसिस’मध्ये दाखल होण्यासाठी २०१४ साली सीरियात गेला. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन, अन्य तरुण झेंडा घेऊन मशिदीसमोर उभे राहून, फोटो काढून सोशल मीडियावर दाखल झाले. ‘एनआयए’ने जे छापे मारले, त्यात दहशतवादाला प्रोत्साहन देणारे साहित्य सापडले. या साहित्यामध्ये इस्लामी दहशतवाद्यांचे मौलवी यांच्या भाषणांच्या कॉम्पक्ट डिस्क सापडल्या. मोहम्मद नासीर या नावाचा कॉमप्युटर इंजिनिअर पकडला गेला. तो तामिळनाडूचा आहे. चेन्नईच्या कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. येथे ‘तौहिद्द जमात’च्या इस्लामी शिकवणीचा त्याच्यावर परिणाम झाला आणि तो दहशतवादाकडे वळला. केरळमध्ये ‘वहाबी इस्लाम’चा प्रचार हा फार जबरदस्तपणे झालेला आहे. वहाबी ही सुन्नी पंथियातील अत्यंत कडवी विचारसरणी आहे.या सर्व घटना अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात अतिशय चिंताजनक आहेत. आपल्या देशात बॉम्बस्फोट झाल्यानंतर अंतर्गत सुरक्षेवर थोडीबहुत चर्चा होते. या चर्चेत ‘मानवतावादी’(?) सेक्युलॅरिस्ट, डावे विचारवंत, मोठ्या कौशल्याने दहशतवाद्यांची बाजू घेऊन युक्तिवाद करताना दिसतात. इस्लामिक दहशतवाद्यांचा इस्लामशी काही संबंध नाही, धर्माशी काही संबंध नाही, दहशतवाद्यांना धर्म नसतो, मुसलमान समाजाकडे संशयाने पाहणे चुकीचे आहे. याला धार्मिक रंग देऊ नये, भाजपचा हा एक धार्मिक अंजेडा आहे वगैरे वगैरे असे युक्तिवाद केले जातात. इतर वेळेला मात्र मीडिया झोपलेला असतो आणि राजकीय पक्ष सत्तेच्या राजकारणात गुंतलेले असतात. आंदोलनासाठी आपल्याकडे विषय भरपूर असतात. कांदा, दूध, भाजीपाला, आरक्षण, पावसामुळे झालेले नुकसान, विकासाच्या वेगवेगळे प्रकल्पांचा विरोध, बुलेट ट्रेन यांसारख्या विषयांना काही अंत नसतो. परंतु, अंतर्गत सुरक्षा, ‘इसिस’चा वाढत जाणारा प्रभाव, ‘अल कायदा’ आणि ‘इसिस’ म्हणजे काय, यासंबंधी जनप्रबोधन करण्याची कुठल्याही राजकीय पक्षाला आवश्यकता वाटत नाही. जर कुणाला विचारले की, ‘इसिस’ म्हणजे काय, तर त्याचे उत्तर किती जण बरोबर देतील, हे सांगणे कठीण आहे.‘इसिस’ या संघटनेचे नाव वर्तमानपत्रातून अनेक वेळा आपण वाचतो. तिचे पूर्ण नाव ‘इस्लामी स्टेट इन इराक अ‍ॅण्ड लेवांत.’ लेवांत हे सीरिया, लेबनॉन, या भूभागाचे पूर्वीचे नाव आहे. ‘अल-कायदा’ या संघटनेतून इराकमध्ये ‘इसिस’चा जन्म झाला. आज ही संघटना ‘अल-कायदा’पेक्षाही अधिक कडवी आणि धोकादायक संघटना म्हणून गणली जाते. या संघटनेचे सभासद इस्लामिक खिलाफत निर्माण करण्यासाठी जिहाद लढत आहेत. आज त्यांचे रणांगणाचे क्षेत्र सीरिया आणि इराक आहे. अबू बकर अल-बगदादी हा या संघटनेचा प्रमुख होता. २०१० साली या संघटनेचा जन्म झाला आणि २०१४ पर्यंत या संघटनेच्या अमलाखाली इराक आणि सीरियातील फार मोठा भूप्रदेश आला. ‘अल-कायदा’तून ‘इसिस’चा जन्म झाला. ‘अल-कायदा’ म्हणजे तळ. ‘अल-कायदा’ने स्वतःला सार्वभौम राज्य म्हणून कधी मानले नाही आणि घोषित केले नाही. ‘अल-कायदा’तून निर्माण झालेल्या ‘इसिस’ने आपण केवळ दहशतवादी संघटना नसून, आम्ही इस्लाम प्रमाण मानणारे राज्य आहोत, आमचे स्वतःचे सार्वभौम राज्य आहे आणि सगळे इस्लामी जगत आमच्या खिलाफतीत आणणे हे आमचे लक्ष्य आहे, असे घोषित करून टाकले. ‘इसिस’ आणि अरबस्तानातील इस्लामिक राज्ये यांच्यात सख्य नाही. ‘अल-कायदा’ला ‘इसिस’चे शुद्ध इस्लामसंबंधीचे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. ‘इसिस’चा एवढ्या झपाट्याने प्रभाव होण्याची काही कारणे आहेत. ‘इसिस’ला इराकचे बरखास्त झालेले प्रशिक्षित सैनिक शस्त्रानिशी मिळाले. सैन्य उभे करण्यासाठी अल बगदादीला प्रशिक्षण देण्याची गरज लागली नाही. सीरियातील तेलाच्या विहिरी ‘इसिस’च्या ताब्यात आल्यामुळे पैशाची गरज त्यांना विशेष भासली नाही. कुवेतने त्यांना अफाट पैसा दिला. कट्टरपंथी मुल्ला-मौलवींनी त्यांना आत्मघातकी जिहादी दिले.


आज अल बगदादी जीवंत नाही. याचा अर्थ ‘इसिस’ संपली असा होत नाही. ओसामा बीन लादेन मेला, याचा अर्थ ‘अल-कायदा’ संपली असा होत नाही. लादेन, बगदादी हा एक विचार आहे. अधिकाधिक त्याला आपण कुविचार म्हणू शकतो. आपल्या पुराणकथांतून असुरांच्या अनेक कथा येतात. एक असुर मेला की दुसरा उभा राहतो. जोपर्यंत जग इस्लाममय करणे हे वेड डोक्यात आहे, तोपर्यंत नवीन रूपात ‘अल-कायदा’, ‘इसिस’ उभ्या राहणार. नवे लादेन आणि बगदादी उभे राहणार. त्याचा एक इतिहास आहे. (अधिक माहितीसाठी- रक्तरंजित मध्यपूर्व - इतिहास आणि वर्तमान- रमेश पतंगे ( प्रकाशक- हिंदुस्थान प्रकाशन संस्था). इस्लामिक खिलाफत मुस्लीम देशांना नको आहे, पाश्चात्त्य देशांना नको आहे आणि भारताचा विचार केला तर भारताच्या दृष्टीने ती अत्यंत धोकादायक आणि भयानक संकल्पना आहे. भारतावर झालेली इस्लामी आक्रमणे इस्लामी खिलाफतींच्या काळात झाली आहेत. त्याचे भयानक परिणाम भारताने भोगले आहेत. परंतु, भारताची या संदर्भातील भूमिका जेवढी कट्टर असायला पाहिजे तेवढी मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी राहिली नाही. अमेरिकेने अल बगदादी याला ठार मारण्यासाठी २५ दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले होते.
शेवटी अमेरिकेने त्याला ऑक्टोबरमध्ये सीरियाच्या सीमेवर ठार केले. ओसामा बिन लादेन आणि बगदादी यांना अमेरिकेनेच ठार केले. आपल्या देशाचा विचार करता, ‘इसिस’च्या संकटांच्या संदर्भात प्रचंड जनजागृती करीत राहिली पाहिजे. कारण, ‘इसिस’चे तत्त्वज्ञान गैरइस्लामी लोकांना जीवंत राहण्याचा अधिकार नाकारते. मानवी स्वातंत्र्याला इथे काही किंमत नाही. स्त्री स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. मूर्तिपूजा त्यांना मान्य नाही, ‘कुराण’ सोडून अन्य धर्मग्रंथ त्यांना मान्य नाहीत. अनेकता, बहुविधता त्यांना मान्य नाही. प्रेषिताच्या काळातील शुद्ध इस्लाम जगात आणला पाहिजे आणि जेथे जेथे मुसलमान आहेत त्यांनी शुद्ध इस्लामचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी त्यांची शिकवणूक आहे. या शिकवणुकीचा प्रचार भारतातही होत असतो. सामान्य जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ‘इसिस’ समर्थकांना जे पाठिंबा देतात, ते आपले मित्र नाहीत, आपले हितकर्ते नाहीत. आपल्या विनाशाची कबर बांधणारे आहेत. जेव्हा प्रश्न आपल्या अस्तित्वरक्षणाशी येऊन भिडतो, तेव्हा स्वरक्षणाची भूमिका महत्त्वाची ठरते. आत्मघातकीपणा आपल्या सर्वांना अग्निकुंडात घेऊन जाणारा ठरेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.