'सरकार पाडणं ही आमची संस्कृती नाही'

26 Sep 2020 19:54:25

ch patil_1  H x



मुंबई :
आज सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात भेट झाल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आले. महाआघाडी सरकार पडण्याशी संबंध नाही असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या भेटीमागे कोणतेही राजकीय संदर्भ नसल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणतात, देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची भेट झाल्याची मला कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अश्या भेटी होत असतात, त्यात बातमी असतेच असे नाही. मागील नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असे म्हणलो नाही. मात्र हे सरकार त्यांच्या अंर्तविरोधामुळे पडणार अस आम्ही म्हणतोय.आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही," असे म्हणत त्यांनी या भेटीबाबत माहिती दिली.

दरम्यान, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत याभेटीमागे कोणतेही राजकीय संदर्भ नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणतात "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही." असे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला.

दरम्यान,सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रॅड हयात येथे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बैठक झाली. दुपारी दीड ते साडे तीन तास चर्चा झाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता.मात्र, राऊत यांनी फडणवीसांशी भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला असला तरी पुढच्या आठवड्यात दैनिक ‘सामना’मध्ये फडणवीस यांची मुलाखत छापून येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Powered By Sangraha 9.0