प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची एक्झिट

25 Sep 2020 14:49:40

SP Balasubhramanyanam_1&n
 
 
चेन्नई : प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या २४ तासांमध्ये त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. कोरोनाचे निदान झाल्यामुळे त्यांना ५ ऑगस्टला चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज दुपारी १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याबद्दल त्यांचा मुलगा एस.पी. चरण यांनी माहिती दिली.
 
 
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांना आधी श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त आले. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
 
 
या लिंकवर वाचा एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा जीवनप्रवास
  
‘दक्षिणेचे रफी’ 
 
५ ऑगस्टला स्वत: बालसुब्रमण्यम यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. ७४ वर्षांच्या बालसुब्रमण्यम यांनी १६ विविध भाषांमधील जवळपास ४० हजारांवर गाणी गायली आहे. तेलगू, तामिळ, कन्नड, आणि हिंदी गाण्यांसाठी त्यांना सहावेळी सर्वोत्कृष्ट गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २००१ मध्ये त्यांना पद्मश्रीने तर २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
Powered By Sangraha 9.0