'शिवसेना नगरसेवकांनी 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहित करू नये'

25 Sep 2020 15:37:37

shivsena_1  H x




मुंबई :
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व माधुरी भोईर, संजना घाडी व सुजाता पाटेकर या नगरसेवकांनी डॉक्टरांचा कोणताही सल्ला न घेता लक्षणानुसार कोरोनावरील औषधे कधी व कशी घ्यावीत याची जाहिरातबाजी केली. तसेच त्याचा समाजमाध्यमातून प्रसार सुद्धा केल्याची बाब उघड झाली झाली. शिवसेना नेत्यांकडून प्रेरणा घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनी नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला न घेता 'कंपाउंडर' कडूनच औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करू नये असा टोला, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी अतिउत्साहात कोरोनावरील औषधांची जाहिरात करून डॉक्टरांच्या कोणत्याही सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला असून जर या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणी औषधे घेतली व त्यातुन काही दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असेल? त्यामुळे अशा प्रकारे औषधांची जाहिरात करणे अत्यंत चुकीचे असून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याने, या सर्व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे पत्राद्वारे केली असून, सरकारने तात्काळ या नगरसेवकांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात जाणार असल्याचे सुद्धा अतुल भातखळकर म्हणाले. मुंबई मध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत असताना त्यावर उपाय शोधण्याचे सोडून व आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याचे सोडून शिवसेना नको ती जाहिरातबाजी करण्यात मग्न असल्याची टीका सुद्धा आ.भातखळकर यांनी केली.
Powered By Sangraha 9.0