कलाउद्योग क्षेत्रात एक ‘कदम’ पुढे असणारी उद्योजिका!

    दिनांक  25-Sep-2020 00:29:22   
|


Priti Kadam_1  


आज या उद्योजिकेचे स्वत:चे दादर आणि कोकणात आऊटलेट आहे. कोरोनाकाळातसुद्धा उद्योगाचा विस्तार करणार्‍या या उद्योजिकेची ही यशोगाथा खर्‍या अर्थाने ‘पॉझिटिव्ह’ आहे. या आहेत ‘अस्मि क्रिएशन’ च्या प्रिती कदम.
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य जगातल्या महान राज्यांपैकी एक होते. महाराजांची दूरदृष्टी आणि मावळ्यांची मिळालेली साथ हे जसं त्याला कारण होतं, तसंच हिरकणीसारख्या शूर मातांमुळेसुद्धा या स्वराज्याला वेगळीच झळाळी मिळाली होती. महाराजांच्या काळात गड-किल्ले आपल्याकडे असणे म्हणजेच तो प्रदेश आपल्या अखत्यारित असण्यासारखा होता. अशाच गडावर राहणारी हिरकणी जेव्हा आपल्या चिमुकल्याच्या आठवणीने कासावीस होते, तो भुकेला असेल, रडत असेल या भावनेने जेव्हा ती व्याकुळ होते, तेव्हा ती त्या रात्री आपल्या बाळाजवळ जाण्याचा निर्धार करते. त्या निर्धारासमोर तो काळ्या कातळांचा गडसुद्धा नतमस्तक होतो आणि हिरकणी चढलेला तो गडाचा भाग ‘हिरकणीचा बुरुज’ म्हणून इतिहासात अजरामर होतो.


 
आजच्या काळात या स्वराज्याची जागा उद्योग-व्यवसायांनी घेतली आहे. गड-किल्ल्यांची जागा कारखाने आणि कार्यालयांनी घेतली आहे, तर अनेक मावळे उद्योजकांच्या रुपात आपले गड-किल्ले उभारत आहेत. अनेक हिरकणी आपलं घरदार-कुटुंब सांभाळून व्यवसाय करत आहेत. काहीजणी एकहाती उद्योग व्यवसायाचा बुरुज चढत आहेत. अशाच आधुनिक हिरकणींपैकी ती एक. कॉर्पोरेट क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तिने उद्योगाची कास धरली. लहानपणापासून तिला हस्तकलेची आवड. याच हस्तकलेच्या वस्तू त्या स्वत: तयार करु लागल्या. सुरुवातीस स्वत:च्या आजूबाजूच्या दुकानांना उत्पादन पुरवू लागल्या. हळूहळू कॉर्पोरेट, लघु-मध्यम उद्योगक्षेत्र असं करत आज या उद्योजिकेचे स्वत:चे दादर आणि कोकणात आऊटलेट आहे. कोरोनाकाळातसुद्धा उद्योगाचा विस्तार करणार्‍या या उद्योजिकेची ही यशोगाथा खर्‍या अर्थाने ‘पॉझिटिव्ह’ आहे. या आहेत ‘अस्मि क्रिएशन’ च्या प्रिती कदम.
 
 
सातव कुटुंब मूळचं पुण्याचं. या कुटुंबाचे प्रमुख रमेश सातव यांचा भाजीपालाचा मोठा व्यापार. भायखळा मार्केटमध्ये रमेश सातव यांचं व्यापारी म्हणून मोठ्ठं प्रस्थ. त्यांच्या या उद्योग-व्यवसायात त्यांच्या पत्नी सुनीता सातव यांनी समर्थपणे साथ दिली. या दाम्पत्यांना तीन मुले. दोन पुत्र आणि एक कन्या. ही कन्या म्हणजेच प्रिती. प्रिती यांचे बालपण गिरगाव परिसरांत गेले. सातवीपर्यंतचे शिक्षण तत्कालीन किंग जॉर्ज स्कूलमध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण गावदेवी येथील सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये झाले. प्रितीला लहानपणापासून कलेची आवड. त्यामुळे पठडीचे शिक्षण न घेता तिने चर्चगेटच्या एसएनडीटी विद्यापीठातून टेक्सटाईल डिझाईन विषयात शिक्षण घेतले. त्यानंतर एका प्रख्यात शैक्षणिक संस्थेतून इंटिरिअर डिझाईनचा तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. या डिप्लोमाच्या शेवटी कोणत्याही एका आर्किटेक्ट संस्थेत इंटर्नशिप करणे सक्तीचे होते. प्रिती यांना घरापासून जवळ असलेल्या एका आर्किटेक्ट फर्ममध्ये इंटर्नशिप मिळाली. त्यानंतर त्याच फर्ममध्ये ती रुजू झाली. सुरुवातीस पगार होता फक्त ८०० रुपये. प्रिती आपले काम चोखपणे करत होत्या. प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, कल्पकता आणि कामाचा उत्साह त्यांच्या पथ्यावर पडला. त्यांनी हळूहळू सगळी कामे शिकून घेतली. त्यांच्या कामातील हातखंडा पाहून कंपनीने तिचा पगार १२०० रुपये केला. देवेंद्र परमार हे त्या कंपनीचे प्रमुख. त्यांनी प्रिती यांना अगदी शिष्यासारखं इंटिरिअर क्षेत्रातले सारे बारकावे शिकवले. दरम्यान प्रिती यांचा ऐन विशीतच कमलाकर कदम या तरुणासोबत विवाह संपन्न झाला. पुढे या दाम्पत्यांना गौरी आणि अस्मि अशी कन्यारत्ने झाली. 

 
 
प्रिती यांना कळले की, गोदरेज या कंपनीमध्ये काही जागा शिल्लक आहेत. प्रिती आपला बायोडाटा घेऊन मुलाखतीसाठी गेल्या. चर्चगेटला त्यांचे ऑफिस होते. नोकरीसाठी एवढी भली मोठ्ठी रांग होती की, प्रितीचा चार तासांनंतर नंबर आला. प्रिती यांचे कामातील कौशल्य, त्यांचा आत्मविश्वास पाहून कंपनीने नोकरी मंजूर केली. कॉर्पोरेट क्षेत्राचा हा अनुभव प्रिती यांच्यासाठी आगळावेगळा होता. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रिती यांनी जाणीवपूर्वक इंग्रजी भाषेवर मेहनत घेतली. प्रभुत्व मिळवले. तिथे त्या किचनवेअर विभागात होत्या. त्यांचे कौशल्य पाहून कंपनीने त्यांना ऑफिस फर्निचर विभागात पाठवले. या विभागात त्या विक्री आणि विपणन पाहू लागल्या. अनेक ओळखी झाल्या. विक्री कौशल्य विकसित झाले. पाच आकडी पगार झाला. प्रिती यांचे काम पाहून त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. मात्र, प्रिती यांना जाणवू लागलं की आपण कुठेतरी सुरक्षित कोशात जगू लागलोय. हस्तकला ही आपली खरी आवड आहे. कॉर्पोरेटच्या त्या चकचकीत दुनियेत आपल्या आवडीला आपण कुठतरी गमावतोय असे त्यांना वाटू लागले. शेवटी त्यांनी निर्धार केला. स्वत:चा आत्मा मारायचा नाही. आपली आवड जपायची. त्यांनी ती ८० हजार रुपयांची नोकरी सोडली आणि आपल्या मूळ आवडीकडे वळल्या. प्रिती यांचे अवघे कुटुंब व्यापार-उद्योगक्षेत्रातले. आपल्या छंदालाच उद्योगात रुपांतरीत करायचे या कल्पनेला तिच्या घरच्यांनी पाठिंबा दिला. त्याचवेळी दसरा-दिवाळीचे दिवस होते. या दिवसांचं औचित्य साधायचे तिने ठरवले. प्रितीने धारावी-सायनमधून पणत्या आणल्या. आपल्या कल्पकतेने त्यांना रंग दिला. एकदम सुशोभित अशा पणत्या तयार केल्या. सुरुवातीला गिरगावमधीलच दुकानांना त्या या पणत्या विकू लागल्या. या पणत्यांनी जणू तिच्या आत्मविश्वासाची ज्योत पेटवली. त्यानंतर त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर छोट्याशा, सुंदर गुढ्या तयार केल्या. या गुढ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घेतल्या. ‘झी गौरव पुरस्कार’ सोहळ्यात या गुढ्या कलाकारांना देण्यात आल्या. सोबतच अनेक व्यावसायिक, उद्योजक, विकासक, बांधकाम व्यावसायिकांनी या गुढ्या मोठ्या प्रमाणावर प्रिती यांच्याकडून विकत घेतल्या. त्यानंतर आलेल्या गणोशोत्सवामध्ये तिने पर्यावरणपूरक अशा कंठ्या तयार केल्या. त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी होती. आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून त्या विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन या कलाकृतींची विक्री करु लागल्या. आपल्या कलेला बाजारपेठ आहे. मागणी आहे. त्यासाठी कुठेतरी एक स्थिर केंद्र असावे या जाणिवेतून तिने वाशीला रघुलीला मॉलमध्ये एक दालन सुरु केले. मराठमोळ्या कलाकृती मिळण्याचे ते जणू केंद्रच बनले. त्यास लोकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला.


२०१५ मध्ये तिने एक धाडसी पाऊल उचलले. थेट मुंबईच्या सर्वाधिक गजबज असलेल्या एका रोडपैकी दादरच्या रानडे रोडजवळ एक दुकान भाड्याने घेतलं. ‘अस्मि क्रिएशन’चे हे कलाकृती केंद्र मुंबईतील अवघ्या कलासक्त रसिकांसाठी आवडीचं केंद्र ठरलं. घर असो वा कार्यालय किंवा कोणताही सण, प्रत्येक क्षणासाठी आनंद द्विगुणित करणारी कलाकृती येथे अगदी वाजवी दरांत मिळू लागली. यामुळे अनेक महिलांना रोजगारदेखील मिळू लागला. हा आकडा काही शेकड्यांमध्ये आहे. प्रिती कदम यांनी या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वस्तू तयार करुन घेऊ लागल्या. सतत काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी असल्याने त्यांनी थेट कुडाळमध्ये या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘अस्मि क्रिएशन’ चे केंद्र सुरु केले. मात्र, दुर्दैवाने कोरोनामुळे अवघ्या महिन्यांत ते बंद करावे लागले. पण, हार मानणं प्रितींना ठावूकच नाही. टाळेबंदी उठवल्यानंतर त्यांनी हे केंद्र पुन्हा सुरु केले. सोबतच एक आणखी धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे भातुकली खेळण्यांच्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा. आज ‘अस्मि क्रिएशन’च्या भातुकलीच्या खेळण्यांना चांगलीच मागणी आहे. तसेच त्या नेमप्लेट्स तयार करतात. त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑफिस स्टेशनरी, टेराकोटा, वॉल म्युरल फ्रेम्स, वुडन वॉल हँगिग हेसुद्धा प्रकार उपलब्ध आहेत. लवकरच लांजा, रत्नागिरी आणि महाड, इंदापूर येथे शाखा सुरु करण्याचे त्यांच्या भविष्यकालीन योजना आहेत. ब्राह्मणसभांमध्ये असलेल्या ग्राहक प्रदर्शनात एकेवर्षी अस्मि क्रिएशनने भाग घेतला होता. काही वर्षांनी त्याच प्रदर्शानचे उद्घाटन करण्याची संधी त्यांना मिळाली. एक यशस्वी उद्योजिका म्हणून आयोजकांनी त्यांना विशेष अतिथी म्हणून हा सन्मान दिला होता. मराठी आणि भारतीय कलाकृतींना फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या क्षितिजावर पोहोचविण्याचे प्रिती कदम यांचे ध्येय आहे. कष्टाची तयारी, कल्पकता, ध्येयनिश्चितता, सातत्य या गुणांच्या जोरावर प्रिती आज यशस्वी उद्योजिका म्हणून उद्योगक्षेत्रात एक ‘कदम’ पुढे आहे.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.