'बँकांच्या वसुली एजंट्सच्या गुंडगिरीला पायबंद घाला'

25 Sep 2020 17:52:36

siddharth shirole_1 
पुणे : कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी अनेक बँकांनी गुंड प्रवृत्तीचे वसुली एजंट्स नेमले असून धमक्या देऊन, जबरदस्तीने ते वसुली करतात. त्यांना पायबंद घालावा अशी मागणी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


ते म्हणतात, गेल्या सहा महिन्यात कोरोना साथीमुळे अनेक मध्यम आणि छोटे उद्योग व्यवसाय आर्थिकदृष्ट्या मंदावलेले आहेत. या व्यावसायिकांनी व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेलले. आत्ताच्या आर्थिक अडचणीच्या काळात त्या कर्जाचे मासिक हप्ते फेडणेही शक्य होत नाही. केंद्र सरकारने पहिल्या सहामाहीत कर्जाचे हप्ते फेडण्यात सवलत दिली त्यामुळे या उद्योजकांना, व्यावसायिकांना, नागरिकांना कर्जफेडीसाठी थोडी उसंत मिळाली. परंतु अद्यापही अनेकजणांना कर्जफेड करण्याइतपत उत्पन्न नाही. त्यांना आर्थिक पेचप्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे.

अशावेळी बँकांनी कर्जाची वसुली करणे हे गरजेचे आहे पण अशा ओढग्रस्तीच्या काळात काही बँकांनी नेमलेले वसुली एजंट्स दादागिरी करतात, बळजबरीने पैसे वसुलीचा तगादा लावतात, कर्जदारांच्या कुटुंबीयांनाही धमकावतात, अशा तक्रारी अनेकांनी केलेल्या आहेत . त्यामुळे आपण यात लक्ष घालावे आणि सर्व बँकांना अशा गैरप्रकारच्या वसुलीला पायबंद घालण्यासाठी सूचना द्याव्यात. तसेच पोलीस खात्यालाही याबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यास सांगावे अशी मागणी शिरोळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातुन केली आहे.
Powered By Sangraha 9.0