संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सात राज्यात ४३ पुलांचे उद्घाटन

24 Sep 2020 10:52:13

indo china_1  H



नवी दिल्ली :
देशाच्या सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे. देशाचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह देशाच्या सीमेलगतच्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ४३ पुलांचे ई-उद्घाटन करणार आहेत. हे सर्व पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात बीआरओने बांधले आहेत. यासोबत ६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहतांग टनेलचे उद्घाटन करणार आहेत.


संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, बीआरओने बनवलेल्या ४३ पैकी १० पूल जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. सात पूल लडाख, दोन पूल हिमाचल प्रदेश, चार पूल पंजाब, आठ पूल उत्तराखंड, आठ पूल अरुणाचल प्रदेश आणि चार पूल सिक्कीममध्ये आहेत. या सर्व पुलांचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील. यावेळी हिमाचल प्रदेश, पंजाब, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीर आणि लडाखचे उपराज्यपालही उपस्थित असतील. यासबोतच बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांचीही हजेरी असेल.देशातील विविध राज्यांना लागून असलेल्या सीमांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेल्या पुलांचे एकाच वेळी उद्घाटन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील चार महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव सुरु असतानाच बीआरओने दिवस-रात्र एक करुन सीमांवरील नदी-नाल्यांवर पूल बांधले आहेत. ४२ पैकी २२ पूल एकट्या चीन सीमेवर आहेत. यापैकी एक पूल हिमाचल प्रदेशच्या दारचामध्ये तयार केला असून त्याची लांबी सुमारे ३५० मीटर आहे.
Powered By Sangraha 9.0