सिद्ध सदा नि:संदेह

23 Sep 2020 21:20:25
Yoga_1  H x W:


मानवी जीवनात करायचे ते निश्चितपणे म्हणजेच संशयरहित अंत:करणाने केले तर ते फलदायी होते. वक्त्याच्या मनात विचारांच्या बाबतीत संदेह असेल, तर त्याचे भाषण अर्थहीन बडबड ठरते. ज्ञान संदेहरहित असावे. तसे ते नसेल तर ज्ञानाच्या गोष्टी व्यर्थ होत. जोपर्यंत मनात शंका आहे, तोपर्यंत ते ज्ञान समाधान देऊ शकणार नाही. त्यामुळे कुठलीही शंका नसलेले खात्रीलायक समाधान देणारे ज्ञान ज्याच्या ठिकाणी असते, त्याला ‘सिद्ध’ म्हणावे, असे समर्थ सांगतात.
 
 
दृश्य जगातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी, तसेच विज्ञानात संशोधन करण्यासाठी सतत अभ्यास, कष्ट आणि प्रयत्नांचे सातत्य लागते. शास्त्रीय शोध लावण्यासाठी किंवा एखाद्या कलेत पारंगतता मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास कष्ट व प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न करीत असताना सभोवतालच्या मोहांना व आकर्षणांना मुरड घालावी लागते.
 
 
त्यांचा त्याग करुन एकाग्रचित्ताने विज्ञानाचा किंवा कलेचा ध्यास घ्यावा लागतो. तद्वत अध्यात्मक्षेत्रात आत्मज्ञान मिळवण्यासाठी, आत्मस्वरुपाशी स्थिर होण्यासाठी साधकाला अभ्यास, कष्ट व सतत प्रयत्न करावे लागतात, अध्यात्मक्षेत्रातील ध्येय साधायचे तर साधकाला भौतिकसुखांचा आणि आकर्षण, मोह यांचा मनाने त्याग करुन एकाग्र मनाने अभ्यास करावा लागतो, हेही तितकेच खरे आहे. हा अभ्यास आंतरिक असल्याने बाह्यत: तो दिसत नाही, पण त्यासाठी अभ्यास प्रयत्न हे कष्ट साधकाला करावे लागतात.
अभ्यासाचा संग धरिला। साक्षात्परिसा निघाला।
 
 
प्रेत्न सांगानी भला। साधनपंथे॥ (दा. ५.९.५५)
 
 
परमार्थ साधनेत साधकाला अभ्यासाला सोबतीने राहावे लागते, तसेच साधक कष्ट आणि प्रयत्न यांनाही बरोबर घेऊन निघालेला असतो. परमार्थाच्या वाटचालीत दुर्बुद्धी, अवगुण, अहंकार, ताठा निंदा, अज्ञान हे दोष अडथळा निर्माण करीत असताना, त्या दोषांना आवर घालून त्यांना बाजूला सारुन साधकाना पुढे जायचे असते. या मार्गक्रमणाच्या प्रक्रियेत साधकाला पूर्वायुष्यातील अवगुणांचा पश्चात्ताप झाल्याने त्याची चित्तशुद्धी होऊ लागते. ती त्याला परमार्थ साधनेत उपयोगी पडते. परमार्थमार्गातील साधकाची लक्षणे स्वामींनी दासबोधात विस्ताराने सांगितली आहेत. त्यापैकी काही लक्षणे आपण यापूर्वीच्या लेखांतून पाहिली आहेत.
 
 
या साधकदशेतून पुढे सिद्धावस्था अनुभवता येते. साधक अभ्यास, प्रयत्न व चिकाटीने आत्मज्ञान मिळवून स्वरुपानुसंधान साधण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु, त्याला स्वरुपाकार होणे लवकर साधत नाही. कारण, साधकाच्या मनात उत्पन्न झालेले काही संशय नाहीसे झालेले नसतात. मनातील संशय व शंका यासाठी समर्पक उत्तरे मिळून त्याचे समाधान झालेले नसते. सिद्धस्थितीत पोहोचल्यावर मात्र अध्यात्मातील स्वरूपस्थितीबाबत त्याच्या मनात संदेह राहिलेला नसतो. साधक निश्चल झालेला असतो. निश्चयाचे समाधान तो अंतरंगात अनुभवत असतो. समर्थ वाड्.मयाचे थोर अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी मोजक्या शब्दात सिद्धाची ओळख करुन दिली आहे, ते म्हणतात. “आत्मनिश्चयाच्या प्रयत्नात असलेला साधक निश्चयरुप नि:संदेह व निश्चल झाला की त्यालाच साधू, ज्ञानी इत्यादी नावांनी ओळखतात.” संदेहरहित होणे हेच सिद्धाचे लक्षण होय. समर्थांनी दासबोधात सिद्धाची ओळख सांगताना म्हटले आहे की, साधकाचा संदेह जाऊन तो नि:संदेह होणे यालाच ‘सिद्ध’ किंवा ‘साधू’ हे नाव आहे.
 
 
साधकासि संदेहवृत्ती। पुढे होतसे निवृत्ती।
याकारणे नि:संदेह श्रोती। साधु वोळखावा॥ (दा. ५.१०.१२)
 
 
 
संदेह याचा अर्थ संशय उत्पन्न होणे, शंका निर्माण होेणे. शंका ही व्यवहारातसुद्धा अनिश्चितता निमार्र्ण करते. आपण प्रत्येक बाबतीत शंका अथवा संशय घेत राहिलो, तर माणसाला जगणे कठीण होईल. संशयाने केलेला कुठलाही व्यवहार, मग तो देवधर्म असो, एखादे व्रताचरण असो, नाहीतर पोथीवाचन असो अथवा धार्मिक विधी असो सारे व्यर्थ जाते, निष्फळ ठरते. त्याचप्रमाणे संशयाने केलेला परमार्थसुद्धा व्यर्थ आहे, असेच म्हणावे लागेल.
 
 
वेर्थ संशयाचे। जिणे वेर्थ संशयाचे धरणे।
वेर्थ संशयाचे करणे। सर्व काही॥ (दा. ५.१०.१९)
 
 
मानवी जीवनात करायचे ते निश्चितपणे म्हणजेच संशयरहित अंत:करणाने केले तर ते फलदायी होते. वक्त्याच्या मनात विचारांच्या बाबतीत संदेह असेल, तर त्याचे भाषण अर्थहीन बडबड ठरते. ज्ञान संदेहरहित असावे. तसे ते नसेल तर ज्ञानाच्या गोष्टी व्यर्थ होत. जोपर्यंत मनात शंका आहे, तोपर्यंत ते ज्ञान समाधान देऊ शकणार नाही. त्यामुळे कुठलीही शंका नसलेले खात्रीलायक समाधान देणारे ज्ञान ज्याच्या ठिकाणी असते, त्याला ‘सिद्ध’ म्हणावे, असे समर्थ सांगतात.
 
 
म्हणोनि संदेहराहित ज्ञान। निश्चयाचे समाधान।
तेचि सिध्दाचे लक्षण। निश्चयेसी॥ (५.१०.२७)
 
 
 
खरे ज्ञान संशय नाहीसे करते आणि समाधान मिळवून देते. साधकाला स्वरुपाविषयी खरे ज्ञान प्राप्त झाल्यावर आत्मस्वरुपाविषयी तो नि:संशय होतो. थोडक्यात, ‘मी आत्मस्वरुप आहे’ अशी खात्री पटणे बुद्धीचा तसा निश्चय होणे आणि तसे नि:संदेहपणे अनुभवणे, हे ज्याला साधले तो सिद्ध होय. या अनुभवाला समर्थांनी ‘मोक्षश्री’ म्हणजे मोक्षाचे ऐश्वर्य म्हटले आहे.
 
 
आत्मबुद्धी निश्चयाची। तेचि दशा मोक्षश्रीची।
अहमात्मा हे कधीची। विसरो नये॥ (५.१०३८)
 
 
 
सिद्धाचे ज्ञान संदेहरहित म्हणजे निश्चयाचे असते. सिद्ध सदैव स्वस्वरुपाच्या ठिकाणी स्थिर असतो. त्यामुळे तो आत-बाहेर समाधानी असतो. त्याचे समाधान कशाने भंग पावत नाही. सिद्ध अंतर्यामी स्वस्वरुपाकार झालेला असला तरी त्याचे बाहेरच्या जगातील वर्तन इतरांसारखेच असते. त्यामुळे बाह्य लक्षणांवरुन सिद्धाला ओळखणे कठीण आहे. देहस्थितीवरुन सिद्ध पुरुषाला ओळखता येत नाही. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा या सिद्ध पुरुषांना त्यांच्या देहावरुन ओळखणे शक्य नाही. साधूची अंतर्स्थिती इतकी सूक्ष्म असते की ती शब्दात पकडता येत नाही. त्याचे वर्णन करुन सांगता येत नाही.
 
 
 
साधक सिद्ध दशेला पोहोचण्यासाठी प्रयत्नपूर्वक साधना करीत असतो. एकदा सिद्धदशा प्राप्त झाली, साधकाने आत्मस्वरुप जाणून त्याचा निःसंदेह अनुभव घेतला तरी त्याने आपले साधन चालू ठेवावे का, असा प्रश्न उपस्थित होतो. समर्थांनी या प्रश्नाचे उत्तर ‘हो, चालू ठेवावे’ असे दिले आहे. स्वामींच्या मते, साधक सिद्ध झाल्यावर त्याला अहंकार झाला व आता आपल्याला साधनाची आवश्यकता काय, असे त्याला वाटले तर तो सिद्धपणाने बद्ध झाला असे म्हणावे लागेल. अशा अहंकारी सिद्धापेक्षा ज्ञानाची तळमळ उत्पन्न झाली तो मुमुक्षू बरा. ज्ञानाच्या तळमळीमुळे तो आज ना उद्या ज्ञानाचा अधिकारी होईल.
 
 
साधन न मने जयाला। तो सिद्धपणे बद्ध जाला।
त्याहुनि मुमुक्षुभला। ज्ञानाधिकारी॥(५.६.७३)
 
 
आपले आचार, उपासना सोडून देणार्‍या सिद्धाची महंती काय कामाची? तीर्थाटन काळात अशी अनेक उदाहरणे पाहिल्याने समर्थ काहीसे चिडून म्हणाले-
 
 
आचार उपासना सांडिती। ते भ्रष्ट अभक्त दिसती।
जळो तयांची महंती। कोण पुसे॥ (५.२.५६)
 
 
सिद्धपणाला पोहोचल्यावरही साधन केलेच पाहिजे, असा स्वामींचा आग्रह आहे. स्वामी सांगतात सिद्धांचा जो सिद्ध असा भगवान शंकरही ध्यानधारणा करतो आणि सतत रामनामाचा जप करतो, त्यांच्यापुढे आपल्यासारख्या क्षुल्लक मानवाची काय कथा?
 
 
जो सिद्धांचाही सिद्ध। ज्ञान वैराग्य प्रसिद्ध।
सामर्थ्यसिंधु अगाध। कैलासराणा।
तो सिद्धचि करी साधन। सर्वकाळ रामचिंतन।
ध्यान धारणा अनुष्ठान। चुको नेदी॥
 
 
 
स्वयंसिद्ध कैलासपती शंकरांचे उदाहरण या संदर्भात देण्यात समर्थांच्या अलौकिक प्रतिभेचा प्रत्यय येतो. सिद्ध निःसंदेह राहून साधन कधी सोडत नाही.
 
- सुरेश जाखडी



Powered By Sangraha 9.0