ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर कालवश

22 Sep 2020 09:59:50

ashalata wabgaonkar_1&nbs



सातारा :
मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. गेले चार दिवस आशालता वाबगावकर यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते. मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास ४० हून अधिक वर्षे त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.




सातारा जिल्ह्यात सध्या ‘देवमाणूस’, ‘आई माझी काळूबाई’ अशा मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. मालिकेतील एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता. यातील काही जणांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने या मालिकेतील सेटवरील सुमारे २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते बाधित आढळल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले. मात्र, आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १००हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. 'गुंतता हृदय हे', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक 'मत्स्यगंधा'च्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या 'अपने पराये'या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना 'फिल्म फेअर'साठी 'उत्कृष्ट सहायक अभिनेत्री'चे नामांकनही मिळाले होते.

Powered By Sangraha 9.0