राज ठाकरे सुप्रिया सुळेंपाठोपाठ रोहित पवारांची मागणी ; आतातरी मुख्यमंत्री ऐकणार का ?

22 Sep 2020 14:55:19

ncp_1  H x W: 0



मुंबई
: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याची मागणी केली आहे. जिम, रेस्टॉरंट आणि क्लास चालक योग्य काळजी आणि दक्षता घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.



गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जिम पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जीमचालक सरकारकडे वारंवार करत आहेत मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे जिम व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विटमधून म्हटले आहे की, कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जिम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती करत सरकार याबाबत निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




रोहित पवार यांच्या आधी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी जिम आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली होती. करोनाच्या काळात जिम बंद करण्यात आल्या आहेत. जिम चालकांनी राज यांची भेट घेऊन लॉकडाऊनमुळे ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती त्यांना दिली होती. आम्ही नियमांचे पालन करूनच जिम सुरू करण्यास परवानगी मागत आहोत, असंही जिम चालकांनी राज यांना सांगितले होते. त्याशिवाय जिम चालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0