विरोधकांचा गोंधळ अस्तित्वासाठी; कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं

22 Sep 2020 16:03:34

raosaheb danve_1 &nb


नवी दिल्ली :
“शेतकरी कृषी बिल हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. महाराष्ट्रात अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक आंदोलन आणि उपोषण करण्याची भाषा करतात,” अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. कृषी भवन येथे ही भेट झाली. यावेळी या दोघांमध्ये साखर उद्योग, कृषी विधेयक बिलावर चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.


यावेळी बोलताना ते म्हणाले, “राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करण्यात आले आहे. शेतकरी कृषी बिल हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक आंदोलन आणि उपोषण करण्याची भाषा करतात." पुढे ते म्हणतात,"एमएसपीच्या आधारावरच शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना एमएसपी जरी बंधनकारक नसेल परंतु एमएसपीच्या खाली शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा असे कुठे लिहिले आहे का?” असा सवाल रावसाहेब दानवेंनी विरोधकांना विचारला.


दरम्यान, शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत कृषी विधेयकावरुन राज्यसभेत झालेल्या गोंधळावर आपली भूमिका मांडली. कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असे सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचे पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडले गेले, असे म्हणत शरद पवारांनी झालेल्या कृत्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.यावेळी शरद पवारांनी निलंबित खासदारांना समर्थन देत एक दिवसांचं उपोषण जाहीर करुन टाकलं. कृषी विधेयकावरच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संभ्रम व्यक्त होत होता, त्या राष्ट्रवादीने हे संशयाचं धुकं दूर करण्याचा प्रयत्न केला. स्वत: शरद पवार यांनी या मुद्द्यावर पक्षाची भूमिका विरोधाचीच असल्याचे सांगितले. शिवाय निलंबित खासदारांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपणही एक दिवसांचे अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे जाहीर करुन टाकले.
Powered By Sangraha 9.0