गेल्या नऊ महिन्यात भारतातून पालीच्या १२ नव्या प्रजातींचा उलगडा

    दिनांक  21-Sep-2020 13:17:35   
|

gecko _1  H x W


महाराष्ट्रातील तरुण संशोधकांची कामगिरी


मुंबई (अक्षय मांडवकर) -
उभयसृपशास्त्र संशोधनात भारताने आघाडी घेतली आहे. कारण, गेल्या नऊ महिन्यांमध्ये भारतातून पालीच्या १२ नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या शोधकार्यात महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचा समावेश असून या शोधांमुळे अधिवास आणि भूप्रदेशानुसार पालींची बदलणारी स्वभाववैशिष्ट्ये आणि अनुकूलनाच्या पद्धतींची माहिती समोर आली आहे.
 
 
 
देशात तयार झालेली उभयसृपशास्त्रज्ञांची तरुण पिढी संशोधन क्षेत्रात अमूल्य योगदान देत आहे. उभयसृपांमधील नव्या प्रजातींचा शोध घेऊन भारताच्या जैवविविधता भर घालण्याचे काम ही तरुण मंडळी करत आहेत. या मंडळींनी गेल्या नऊ महिन्यांमध्ये दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांमधून पालीच्या बारा नव्या प्रजातींचा उलगडा केला आहे. 'निमास्पिस','हेमिडॅक्टिलस', 'हेमिफाय्लोडॅक्टिलस' या कुळातील नव्या पाली असून त्यामध्ये सर्वाधिक 'निमास्पिस' या कुळात नव्या प्रजातींची भर पडली आहे. यामध्ये कर्नाटकातून 'निम्पास्पिस बंगारा', आंध्रप्रदेशामधून 'निम्पास्पिस ग्रेनेटीकोला', 'निमास्पिस ऋषीव्हॅलीएन्सिस', 'हेमिडॅक्टिलस ऋषीव्हॅलीएन्सिस', ‘निमास्पिस अॅवासाबिने', तामिळनाडूमधून 'निम्पास्पिस येलेगिरीएन्सिस', 'हेमिफाय्लोडॅक्टिलस निलगिरीएन्सिस', 'हेमिडॅक्टिलस सिरुमलायाएन्सिस', 'हेमिफाय्लोडॅक्टिलस पेन्निसुलारीस' कर्नाटकातून निमास्पिस मॅग्निफिका, निमास्पिस स्टिल्लापूल्विस आणि ओडिशातून 'हेमिफाय्लोडॅक्टिलस मिनीमस' या पालींचा समावेश आहे. 
 
 
 
या शोधांमुळे 'निमास्पिस' कुळातील पालींची प्रदेशानुरुप बदलणारी स्वभाववैशिष्ट्ये समोर आली आहेत. याच कुळातून ‘निमास्पिस अॅवासाबिने' या भारतातील सर्वात लहान पालीचा शोध लावण्यात आला आहे. ‘निमास्पिस’ कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असल्याने त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. मात्र, या नव्या शोधांमुळे 'निमास्पिस' कुळातील पाली या पश्चिम घाटाबाहेरही आढळत असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या प्रदेशात या पाली निशाचर जीवन जगत असल्याची नोंद संशोधकांनी केली आहे. या क्षेत्रात सकाळचे तापमान अधिक असल्याने या पालींनी स्वत:ला रात्रीच्या वेळेत वावरण्यासाठी विकसित केल्याचे उघड झाले आहे.
 
 
 
'निमास्पिस' कुळातील पालींचा पश्चिम घाटामधील अधिवास हा आद्रर्तायुक्त भागांमध्ये असतो. या पाली तीव्र उष्णता सहन करु शकत नाहीत. परंतु, आता या पाली ज्या प्रदेशातून सापडल्या ते उष्ण प्रदेश आहेत. अशा परिस्थितीत तग धरुन राहण्यासाठी त्या ग्रेनाईटच्या खडकांवर अधिवास करत असल्याची नोंद या शोधकार्यामुळे झाली आहे. पालींचे हे महत्वपूर्ण शोधकार्य 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन', 'नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्स्टिट्यूट' (एनसीबीएस), 'झूलाॅजीकल सोसायटी आॅफ इंडिया' (झडएसआय), 'नाॅर्थ ओडिशा विद्यापीठ' आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएसएच) यांनी पूर्ण केले आहे. तर हे संशोधन महाराष्ट्रातील अक्षय खांडेकर, शौनक पाल, इशान अग्रवाल, स्वप्निल पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि ओडिशामधील प्रत्युक्ष महापात्रा, सुशिल दत्ता, कु्क्कू महापात्रा यांनी केले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.