सामाजिक कार्यकर्त्या कोमल पवार यांचे निधन ; उदयनराजेंची भावनिक पोस्ट

02 Sep 2020 15:17:01

Komal Pawar_1  
 
सातारा : अवयवदानासाठी मोठे काम करणाऱ्या साताऱ्यातील कोमल पवार – गोडसे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ‘कोमल न्यू लाइफ फाउंडेशन’च्या त्या संस्थापिका होत्या. त्यांच्या जाण्याने सातारा शहरातील युवा वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील एक भावनिक पोस्ट लिहित दुख व्यक्त केले. “कोमलचं जाणं ही केवळ सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी आहे.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
 
 
 
 
“सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार-गोडसे हिला २०१७ मध्ये ‘प्लमोनरी हायपरटेन्शन’ या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले. पण, तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. कोमल ही महाराष्ट्रातील पहिली दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण झालेली व्यक्ती ठरली होती. पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे हलवण्यात आले. परंतु बुधवारी पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.” असे उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे.
 
कोण आहेत कोमल पवार- गोडसे?
 
मुळची सातारची असलेली कोमल पवार हिचा फलटण तालुक्यातील तरडफ येथील धीरज विलास गोडसे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या एक वर्षांमध्येच ती आजारी पडली. तिच्यावर सातारा, पुणे, मुंबई, बेंगलोर येथे उपचार करण्यात आले. मात्र, आजार दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्याने डॉक्टरांनी हृदय आणि फुफूस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध झाले होते, तरी त्यासाठी होणारा खर्च मात्र मोठा होता. यासाठी एकून ५० लाखांहून अधिक खर्च लागणार होता. मात्र, सातारकर आणि काही समाजसेवी संस्थांच्या मदतीमुळे तिच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. त्यानंतर अवयवदानाचे महत्त्व पटवण्यासाठी कोमल आणि तिचे पती धीरज गोडसे यांनी ‘कोमल न्यू लाइफ फाउंडेशन’ संस्थेमार्फत हे कार्य सुरू केले. तसेच त्यांनी याद्वारे अनेक गरजूंना मदतही केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सातारा हळहळला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0