पश्चिम रेल्वेच्या आता ५०० विशेष लोकल फेऱ्या!

19 Sep 2020 18:05:17
Local_1  H x W:

गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने फेऱ्या वाढवणार; मात्र सामान्यांना अद्याप प्रवेश नाही!


मुंबई : मुंबईत उपनगरी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करावी अशी मागणी वाढत असतानाच, पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या विशेष लोकल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता दररोज पश्चिम रेल्वेच्या ५०० विशेष गाड्या (फेऱ्या) धावणार आहेत.


कोरोना प्रतिबंधासाठी लोकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर १५ जूनपासून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी लोकल सुरु झाली. सुरुवातीला ३५० लोकल फेऱ्या होत होत्या. परंतु प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सोमवार २१ सप्टेंबरपासून १५० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर आता रोज ५०० फेऱ्या होणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, सकाळी गर्दीच्या वेळी ३० तर संध्याकाळी गर्दीच्या वेळी २९ अशा एकूण दिवसभरासाठी १५० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.


पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर चालवल्या जात आहेत. या लोकलसेवेमुळे अत्यावश्यक सेवेच्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा प्रवाशांना मिळत आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने सध्या धावत असलेल्या विशेष लोकल कमीच पडत आहेत. प्रामुख्याने पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी आणि सायंकाळी विशेष लोकलमध्ये मोठी गर्दी पहावयाला मिळत आहे. ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.


या विशेष लोकल केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच चालवल्या जात असून त्याशिवाय कुणालाही या लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे पुन्हा एकदा नमूद करण्यात आले आहे. यातील विरारसाठी अप आणि डाऊन मार्गावर ३४ जलद आणि ३ धीम्या मिळून ७४ फेऱ्या असतील. तर बोरीवलीसाठी अप मार्गावर धीम्या ३७ व डाऊन मार्गावर ३८ धीम्या व १ जलद गाडी असेल.




Powered By Sangraha 9.0