जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास!

19 Sep 2020 15:20:09
Railway_1  H x

सर्वसामान्यांसाठी मनसेचे आंदोलन; लोकल सेवा सुरु करण्याची मागणी!


मुंबई : राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात खबरदारी म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण रेल्वेप्रवास बंद करण्यात आला होता. मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल सेवाही बंद करण्यात आली होती. दरम्यान आता अनलॉक सुरू आहे. तरीही लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मनसे सर्व कायदे मोडून सविनय कायदेभंग करणार आहे.


अनलॉक सुरू झाले आहे. मुंबईतील चाकरमान्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र रेल्वे सेवा अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अनेकांनी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. तरीही सरकारने लोकल सेवा सुरू केलेली नाही. यामुळे येत्या २१ सप्टेंबरला जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास, असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे. मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी याविषयी माहिती दिली आहे.


तर, मनसे नेते संतोष धुरी यांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट करत या बाबत माहिती दिली आहे. आज सर्वसामान्य जनतेला कामावर जाताना त्रास सहन करावा लागतो. बसमध्ये प्रवास केला तरी गर्दी, रस्त्यावरून गेलं तरी गर्दी, हा गर्दीचा त्रास जर वाचवायचा असेल तर रेल्वे प्रवास सुरू करावा. पण घरात बसून जे सरकार चालवत आहेत, त्यांना याची काहीच काळजी नाही. त्यासाठी आम्ही मनसेतर्फे २१ सप्टेंबरला रेल्वेने प्रवास करणार आहोत. जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल लवकर सुरू करा, अशी मागणी विशेषतः उपनगरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २१ सप्टेंबरला ‘जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास’ असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे.




Powered By Sangraha 9.0