भारतीय नौदलाची शान ‘आयएनएस विराट’चा अंतिम प्रवास

19 Sep 2020 12:43:43

ins virat_1  H
मुंबई : भारतीय नौदलाची शान मानली जाणारे ‘आयएनएस विराट’ हे विमानवाहू जहाज अखेर तोडणीच्या दिशेने जाणार आहे. शनिवारी, १९ सप्टेंबरला सकाळी ते मुंबईच्या किनारपट्टीवरुन गुजरातच्या दिशेने हलवले जाणार आहे. भावनगर जिल्ह्यातील अलंग समुद्रकिनाऱ्यावर त्याची तोडणी होणार आहे.

मूळ ब्रिटीश बनावटीचे हे जहाज १९८७ मध्ये भारतीय नौदलात दाखल झाले. सी हॅरिअरसारख्या लढाऊ विमानांसह अरबी समुद्रावर दबदबा ठेवण्यात या जहाजाने मोलाची भूमिका बजावली. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानच्या कराची बंदरातून युद्धनौका बाहेर पडू नये यासाठी शत्रूवर वचक ठेवण्याची कामगिरी या जहाजाने केली होती. मार्च २०१७ ला हे जहाज नौदलातून निवृत्त झाले. अलिकडे मे महिन्यात या जहाजाच्या तोडणीची निवीदा निघाली होती. त्यामध्ये भावनगर येथील श्री राम समुहाने ३८.२४ कोटी रुपयांची बोली लावली व ती मान्य झाली. त्यानुसार या समुहाला हे तोडणीच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. तोडणीतून जेवढे लोखंड प्राप्त होईल, त्यातील किमान दहा टक्के लोखंड देशांतर्गत पोलाद उद्योगांना स्वस्त दरात पुरविण्याच्या अटीवर हे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार ‘आयएनएस विराट’ नावाचा हा मानाचा तुरा शनिवारी विशेष जहाजांच्या साहाय्याने ओढत गुजरातच्या दिशेने रवाना होणार आहे.
Powered By Sangraha 9.0