दिशा सालीयनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा : रामदास आठवले

19 Sep 2020 17:17:09

Ramdas aathvale_1 &n



दिशाचा मृत्यू अपघाती नसून, हत्याच झाल्याचा दाट संशय!


मुंबई : दिशा सालीयन यांच्या मृत्यूची मुंबई पोलिसांनी अपमृत्यु म्हणून नोंद केली आहे. दिशा सालीयन यांची आत्महत्या मुंबई पोलीस सांगत असले तरी दिशा सालीयन यांची आत्महत्या नसून हत्या असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दिशा सालीयन यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी आपली मागणी असून त्याबाबतचे पत्र गृहमंत्री अमित शहा यांना आपण पाठवीत असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जाहीर केले.


दिशा सालीयन या दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूतच्या माजी व्यवस्थापक होत्या. त्यांनी मालाडमध्ये त्यांच्या निवासस्थानी पार्टी दिली होती. मग त्या त्याच रात्री आत्महत्या का करतील? पार्टी झाली त्या रात्री दिशावर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा संशय आहे. दिशाचा मृतदेह पोलिसांना मिळाल्यानंतर त्या मृतदेहाची पोस्ट मोर्टम रिपोर्ट काय सांगतो? मुंबई पोलीस खून झाल्यानंतर लगेच आरोपीपर्यंत पोहचत असतात. मात्र दिशा सालीयनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव असल्याची शंका येते.


एका महिलेची हत्या ही आत्महत्या दाखवून प्रकरण दडपले जाणार असल्याचा दिशा मृत्यू प्रकरणी शंका येते. मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, दिशा मृत्यू प्रकरणी कोणीही तक्रारदार नाही त्यामुळे दिशा मृत्यूप्रकरणी हत्या असावी याबाबत मुंबई पोलिसांचा तपास पुढे गेला नाही. खरे म्हणजे मृतदेह सापडल्यानंतर मुंबई पोलीस सुगावा काढत गुन्हेगारापर्यंत पोहोचतात. या प्रकरणात मात्र मुंबई पोलीस तक्रारदराची का वाट पहात आहेत? कोणी तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. दिशा सालीयनच्या मृत्यूची मुंबई पोलिसांनी तिची हत्या झाली असावी का या शक्यतेच्या दृष्टीने स्वतःहून तपास करणे आवश्यक होते. दिशा सालीयनचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर दिवंगत सुशांतसिंह राजपूतही अस्वस्थ झाला होता. दिशा सालीयनच्या मृत्यूचा सुशांतसिंहच्या मृत्यूशी काहीतरी सबंध असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दिशा सालीयनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी आपली मागणी असून या मागणीचे पत्र आपण लवकरच गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0