हैं तैयार हम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2020   
Total Views |


Ind Chi_1  H x

 


चीनमधील माध्यमे आणि त्यांचे भारतीय माध्यमांतील काही हस्तक सध्या जोरदार दुष्प्रचार करताहेत. लडाख सीमेवर भारतीय सैन्य चिनी सैनिकांविरोधात तैनात आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून बर्फवृष्टीला सुरुवात होईल. त्यावेळी भारतीय सैन्य आपल्या सैनिकांची काळजी घेऊ शकणार नाही. थोडक्यात, सैनिकांच्या जीवनावश्यक गरजा जसे पाणी, अन्नधान्य किंवा लढाईला तोंड फुटले तर दारूगोळा पुरवण्यास, म्हणजेच सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्यात भारतीय सैन्याला खूप त्रास होऊ शकतो, हा दुष्प्रचार अत्यंत चुकीचा आहे. कारण, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत बर्फवृष्टी झाली तरीही भारतीय सैन्य युद्धाला सामोरे जायला सज्ज आहे.

 



ड्रोनच्या माध्यमातून लष्कराचे लडाखमध्ये व्यवस्थापन अशक्य

 


‘ग्लोबल टाईम्स’ आणि इतर चिनी वर्तमानपत्र खोटा प्रचार करत असून ड्रोनच्या माध्यमातून चीन लडाख सीमेवर लष्कराला रसद पुरवेल, असे सांगत आहेत. जगात अजूनतरी अतिथंड भागामध्ये वापरले जाणारे ड्रोन तयार झालेले नाही. कारण, अतिथंड भागात यांत्रिक क्षमता ही ५०-६० टक्क्यांनी कमी होते. जे ड्रोन इतरत्र १०० किलो सामान वाहून नेऊ शकतात, ते या भागात मात्र ६० टक्क्यांपेक्षा कमी सामान घेऊन जातील. या भागामध्ये अत्यंत वेगाने वारे वाहत असल्याने ड्रोन तिथे वापरणे शक्य नाही. जेव्हा तिथे बर्फाचे वादळ येते, तापमान ऋण असते, तेव्हा ड्रोनच्या माध्यमातून लष्कराचे व्यवस्थापन करणे सोपे नाही. जगात अशा प्रकारे ड्रोन वापरून सैन्याचे व्यवस्थापन झालेले नाही. चीनला ड्रोनच्या माध्यमातून सैनिकांना गरम अन्न पोहोचवणे लडाखसारख्या अत्युच्च डोंगराळ भागात शक्य नाही.

लढाईचे सामान पोहोचवण्यासाठी दोन मार्ग

 


लडाखचा भाग समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंचीवर आहे. त्यामुळेच पुढील महिन्यापासून जेव्हा लडाखमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात होईल, तेव्हा रस्ते बंद होतात. म्हणून सैन्याला लागणारा दारूगोळा, संरक्षण साहित्य, इंधन किंवा अन्नधान्य हे सर्व रस्ते बर्फाने बंद होण्याअगोदरच साठवणूक केले जाते. याला सैन्याच्या भाषेत ‘विंटर स्टॉकिंग’ म्हटले जाते. लडाखच्या सीमेवर जाण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एक रस्ता जम्मूतून, बनिहाल खिंडीमधून श्रीनगरमध्ये जातो. तिथून तो जोझिला खिंडीमधून द्रास, कारगीलमधून लेहमध्ये जातो. हा रस्ता वर्षातील सहा ते सात महिनेच वाहतुकीकरिता खुला असतो. नंतर प्रचंड बर्फवृष्टीमुळे हा रस्ता बंद असतो. यावेळी मात्र हा रस्ता अधिक वेळ उघडा राहील. कारण, बर्फ हटवणारी आधुनिक यंत्रे ब्लोवर, डोझर्स आपल्याकडे आहेत. त्यामुळे हा रस्ता जो ऑक्टोबरमध्येच बंद होतो, तो यंदा नोव्हेंबरपर्यंतसुद्धा खुला असेल. त्यामुळे सैनिकांना सर्व प्रकारची रसद नियमितपणे पुरवण्यासाठी आपल्याला त्या मार्गाचा उपयोग होईल. दुसरा रस्ता हिमाचल प्रदेशातून सुरू होऊन खारदुंगला खिंडीतून लेहला पोहोचतो, तोदेखील पाच-सहा महिने सुरू असतो. उर्वरित महिने तो बंद असतो. आता तिथे आपण अटल बोगदा खोदला आहे. त्यामुळे हा रस्तादेखील सात ते आठ महिने खुला राहण्याची शक्यता आहे.

हवाईमार्गे रसद पुरवठा

 


त्याशिवाय सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्याचे काम हवाईमार्गे वाहतूक, विमाने/हेलिकॉप्टरच्या मदतीनेही करता येते. त्यासाठी लेह, थोईस, कारगील या ठिकाणी विमानतळे आहेत. त्याव्यतिरिक्त आपल्याकडे अनेक प्रगत लॅण्डिंग मैदाने (Advance Landing Ground) आहेत. अनेक ठिकाणी हेलिपॅड्स बनवली आहेत, जेणेकरून हवाईमार्गे हिवाळ्यातही आपण सैनिकांना रसद पुरवू शकतो. आपल्याकडे ५०-६० टन वजन वाहून नेणारी ‘सी हर्क्युलस विमाने’ आहेत. ही विमाने हिवाळ्यातही बर्फ पडलेला असला तरीही व्यवस्थित उड्डाण करू शकतात. १९९९ साली झालेल्या कारगील युद्धातही तिथे मोठ्या संख्येने आलेल्या सैनिकांचे व्यवस्थापन आपण योग्य पद्धतीने केले. त्या तुलनेत चिनी सैन्याला असा अनुभव नाही. त्यांनी इतक्या उंचीवर आपले सैन्य तैनात केलेले नाही.

‘विंटर स्टॉकिंग’

 


चीनने शेवटचे युद्ध लढले होते, ते १९७८ साली, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. बाकीच्या वेळी तिबेटमधील चिनी सैन्य बराकींमध्ये राहते, जसे आपले सैन्य शहरात राहते तसे. त्यामुळे अतिदुर्गम, अतिउंच भागामध्ये जिथे प्रचंड बर्फ पडतो तिथे कसे लढायचे, याचा चिनी सैन्याला अजिबातच अनुभव नाही. याआधी जितके भारतीय सैन्य सीमेवर तैनात असायचे, त्यापेक्षा तिप्पट सैन्य सीमेवर तैनात केले आहे. ते चीन विरुद्ध आक्रमक कारवाईसाठी सज्ज आहे. चीनचे जर आक्रमण केले, तर चीनवर प्रतिहल्ला करून आपण त्यांना नामोहरम करू शकतो. त्यांच्याकरिताही पूर्ण ‘विंटर स्टॉकिंग’ करण्यात आले आहे.
अतिउंच आणि अतिथंड वातावरणात सैनिकांना ‘ईसीसी क्लोदिंग’ दिले. म्हणजे ‘एक्स्ट्रा कोल्ड’ म्हणजे अतिथंड वातावरणात लागणारे कपडे. हे कपडे सैनिकांना पुरवले गेले आहेत. अत्युच्च भागात राहाणार्‍या या सैनिकांना अत्यंत पौष्टिक असा आहार दिला जातो. कारण, त्या भागात राहायचे तर सैनिकांना अत्यंत उच्च दर्जाचे जेवण द्यावे लागते. त्याचीही साठवणूक आधीच तिथे केलेली आहे.

एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचेही आव्हान असते. सैनिक ज्या भागात तैनात आहेत, तिथे बोअरवेल खणलेली आहे. ट्यूबवेल आहेत. अनेक ठिकाणी वॉटर पॉईंटस तयार करून पाईपच्या मदतीने आपण सैनिकांना पाणी पोहोचवू शकतो. या भागात बर्फ पडत असल्याने त्यापासूनही पाणी तयार करता येते. ते पिण्यासाठी वापरता येत नाही. पण, इतर सर्व कामांसाठी ते वापरता येते. पिण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते. ती पद्धत आधीपासून आपण तयार केली आणि वापरतो आहोत.
युद्ध झाले तरीही दारूगोळा कमी पडणार नाही

 


आपले सैन्य बंकर्समध्ये राहते, तिथे सेंट्रल हिटिंग सिस्टीम तयार कार्यरत केली आहे. सौरऊर्जेच्या मदतीने त्यांचे बंकर्स, राहण्याची ठिकाणे उबदार राहावीत याची सोय केली आहे. शिवाय गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. कारण, तापमान -३० ते -४० अंश सेल्सिअसपर्यंत असते. या भागात लढाई झाली आणि आपल्या बंकर्सवर बॉम्बगोळे पडले, तर बंकर्सच्या संरक्षणासाठी ‘ओव्हरहेड प्रोटेक्शन’ही उत्तम दर्जाचे तयार करण्यात आलेले आहेत. आपल्या सैनिकांना गरज भासल्यास दारूगोळा मोठ्या प्रमाणात लागू शकतो. २०-२५ दिवस युद्ध सुरू राहिले तरीही दारूगोळा कमी पडणार नाही, एवढी साठवणूक तिथे करण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर विशिष्ट संरक्षण दारूगोळा जसे जमीन, हवाई प्रतिकारासाठी क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रे विशिष्ट प्रकारे विशिष्ट पद्धतीने साठवून ठेवावी लागतात. कारण, उघड्यावर ठेवल्यास त्यांची क्षमता कमी होते. त्यासाठी खास ‘अंडरग्राऊंड बंकर्स’ म्हणजे जमिनीखालील बंकर्स तयार करण्यात आले आहेत, जे दारूगोळ्याचे संरक्षण करतात. या भागात आपले रणगाडे, चिलखती वाहने आहेत, त्यांना विशेष इंधन लागते, त्यांना वंगणही उच्च दर्जाचे लागते, या सर्व गोष्टींची त्या भागात साठवणूक केली आहे.

उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा-सुविधा

 


त्याशिवाय या भागातली वैद्यकीय सेवा-सुविधाही उच्च दर्जाची आहे. विविध ठिकाणी म्हणजे लेह, कारगीलसारख्या अनेक ठिकाणी उच्च दर्जाची सैनिकी रुग्णालये आहेत. उंच भागात ज्या प्रकारचे आजार, रोगराई पसरू शकते त्यासाठी लागणारी औषधे, विशिष्ट साहित्य तिथे आधीपासूनच साठविले आहे. भारतीय लष्कराची ऑपरेशन थिएटर सीमेवर काम करतात. जखमी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी ज्या हेलिकॉप्टरची गरज भासते, तीही तिथे तैनात करण्यात आलेली आहेत. या भागात चिनी विषाणूचा म्हणजेच कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून आपण योग्य ती काळजी घेत आहोत. भारतीय सैन्यावर चिनी विषाणूचा काहीही दुष्परिणाम झालेला नाही. भारतीय सैन्याने ज्या पद्धतीने त्याचा मुकाबला केला ते, जगाने कसा मुकाबला करायला हवा होता यासाठी उत्तम उदाहरण ठरले आहे. याचाच अर्थ या भागात लढाई झाली, तरी भारतीय सैन्य सर्वार्थाने चिनी सैन्याला उत्तर द्यायला तयार आहे. थोडक्यात सांगायचे तर भारतीय लष्कर अतिउंच भागातील सैनिकांची योग्य ती काळजी घेते आहे. हिवाळ्यात लढाई झाली तर भारतीय लष्कर शत्रूला तोंड देण्यास पुरेपूर सज्ज आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@