अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना बेड्या; घातपाताचा मोठा कट उधळला

    दिनांक  19-Sep-2020 10:56:50
|

NIA_1  H x W: 0नवी दिल्ली :
देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या दहशवादी कारवायांना मोठा धक्का देण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आले आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये एनआयएने अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज एनआयएच्या टीमने अनेक ठिकाणी छापे मारत कारवाई केली. एनआयएने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्णाकुलममध्ये रेड मारत ही कारवाई केली. एनआयएने म्हटलं आहे की, सर्व अटक केलेले संशयित हे दहशतवादी कृत्यांशी संबंधित आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा, मोठा घातपात घडवण्याचा अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या कट होता. मात्र एनआयने कारवाई करत त्यांच्या हा कट उधळून लावला आहे. अटक करण्यात आलेले सर्व दहशतवादी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अल-कायद्याशी संबंधित असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. तसेच अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून डिजिटल डिव्हाईस आणि महत्त्वाच्या कागदपत्रांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.


काही दिवसांपूर्वीच बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. तसेच दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकी दरम्यान या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. भूपेंदर उर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंह अशी दहशतवाद्यांची नावं आहेत. दहशतवाद्यांकडून सहा पिस्तुलं आणि ४० काडतुसं जप्त करण्यात आली. हे दोघेही पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.