अधिकस्य अधिकं फलम् ।

18 Sep 2020 22:13:14
Vishnu_1  H x W
 
 
 

अधिक आश्विन मास येणे हा दुर्मीळ योग आहे, असे संदेश सध्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत. पण, आश्विन या आधीही अधिक मास आलेला होता. १९ वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये याच तारखांना म्हणजे १८ सप्टेंबरपासून १६ ऑक्टोबर या कालावधीत आश्विन अधिक मास आला होता. लीप वर्ष आणि अधिक मास हा दुर्मीळ योग आहे, असेही संदेश पसरत आहेत. परंतु, लीप वर्ष हे ग्रेगोरियन आहे. त्याचा आणि अधिक मासाचा काही संबंध नाही. तेव्हा, अधिक मास, त्याची गणना यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
-
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी एक विशिष्ट वातावरण असते. ऊन-पावसाचा खेळ असतो. पिवळी हरणाची फुले फुलतात. कांगण्या, कवंडळे धरतात. वेलींवर बचनागाची फुले येतात. रानात केवडा फुलतो. दिवाळीत पहाटे सौम्य थंडी असते. पहाटे उठून गरम पाण्याने स्नान करायला आणि नंतर भरगच्च फराळ करायला आपल्याला आवडतेच. मकरसंक्रातीवेळी थंडी अधिकच वाढते. तिळाचे, गुळाचे, उष्ण पदार्थ खावेसे वाटतात. रामनवमीला उन्हाच्या तीव्र झळा, आंबा-काजूच्या मोहराचा मोहक वास असतो. एकंदरीतच त्या त्या वातावरणाशी तो तो सण एकरूप झालेला असतो.
 
 
 
मुस्लीम बांधवांच्या रमजान ईदचे तसे नाही. रमजान ईद हा सण प्रतिवर्षी दहा-बारा दिवस आधी येतो. गेल्या वर्षी तो जूनमध्ये आला होता. या वर्षी २५ मे रोजी आला. पुढील वर्षी तो १३-१४ मे रोजी येईल. यानंतर तो एप्रिल, फेब्रुवारी नंतर डिसेंबरमध्येही येईल. म्हणजेच रमजान ईदवेळी निसर्ग वेगवेगळ्या अवस्थेत असेल. गणपती, दिवाळी, मकरसंक्रातीचे विशिष्ट वातावरण प्रतिवर्षी तसेच असेल, पण गोष्ट ईदबाबत घडत नाही.
 
 
असे का बरं होत असेल? हिंदू पंचाग हे चांद्र महिन्याचे आहे. मुस्लीम कालगणनाही चांद्र महिन्यानुसारच आहे. इंग्रजी कॅलेंडर आणि आपले ऋतुचक्र हे मात्र सौर महिन्याशी जोडलेले आहे. चांद्र महिना २९ दिवसांचा असतो, तर सौर महिना ३०, ३१ दिवसांचा असतो. यामुळे प्रतिवर्षी चांद्र आणि सौर वर्षाच्या एकूण दिवसांमध्ये १३ ते १४ दिवसांचा फरक पडतो. हिंदू पंचागामध्ये हे अंतर भरून काढण्यासाठी सुमारे अडीच वर्षांनी एका अधिक महिन्याची योजना असते. त्यामुळे ऋतुचक्रांशी आपल्या सणांचा मेळ राहतो. मुस्लीम कालगणनेत ही योजना नाही. त्यामुळे ईद हा सण विशिष्ट ऋतूत येत नाही.
 
 
यावर्षी १८ सप्टेंबरपासून ‘अधिक आश्विन’ सुरू झाला. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी ‘निज आश्विन’ म्हणजे खरा आश्विन सुरू होणार आहे. यावेळी ‘अधिक आश्विन’मुळे दिवाळी उशिरा येणार आहे. तरीही दिवाळीच्या वेळी असणार्‍या वातावरणात फार-जास्त फरक पडणार नाही. सगळीकडे शेते बहरलेली असतील. शरदाचे टिपूर चांदणे पडायला सुरुवात झालेली असेल. खळखळणार्‍या नद्या थोड्या शांत झाल्या असतील. हवेमध्ये हलकासा आणि हवाहवा वाटणारा गारवा असेल. एकंदरीतच निसर्गाशी आपल्या सांस्कृतिक जीवनाचा मेळ साधला जाईल.
 
 
 
शं. बा. दीक्षित या प्राच्यविद्याविशारदांच्या मते, भारतात ‘अधिक मास’ मानण्याची पद्धत इसवी सन पाच हजार वर्षांपासून आहे. भारतीयांचे अंकगणित किती पक्के होते याचाच हा आणखीन एक पुरावा म्हणावा लागेल. लोकमान्य टिळकांच्या मते, सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांचा समन्वय राखण्यासाठी अधिक मास मानण्याची पद्धत वेदकाळापासून आहे. चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण, या महिन्यांमध्येच सूर्याची भ्रमणगती मंद असते व त्याला एका राशीतून दुसर्‍या राशीत जाण्यास जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यामध्येही अधिक मास येतो. ज्या वर्षी अधिक मास येतो, त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात.
 
 
 
प्रथमत: येतो तो ‘अधिक मास’ आणि नंतर लगेच येणारा महिना हा ‘निज मास.’ एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की, १९ वर्षांनंतर तोच महिना ‘अधिक मास’ म्हणून येतो. ज्यावर्षी चैत्र हा अधिक मास असतो, त्यावर्षी अधिक मासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढीपाडवा मात्र लगेचच नंतर येणार्‍या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो. काही वेळा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनवेळा रास बदलतो. अशावेळी ‘क्षय मास’ येतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांमध्ये अधिक मास कधीही येत नाहीत, ‘क्षय मास’ येतात. ‘क्षय मासा’च्या आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हातरी थोड्या अंतराने दोन ‘अधिक मास’ येतात.
 
 
 
ज्या चांद्रमासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, तो मास हा ‘अधिक मास’ समजला जातो. ज्या चांद्रमासात सूर्याची भ्रमणगती वाढल्याने दोनदा सूर्य संक्रमण होते, म्हणजे सूर्य दोनदा राशी बदलतो, तो ‘क्षय मास’ होय. सौरमास आणि चांद्रमासाची सांगड घालण्यासाठी ‘अधिक मास’ व ‘क्षय मास’ यांची निर्मिती केलेली आहे.अधिक मासाला ‘पुरुषोत्तम मास’, ‘मल मास’, ‘संसर्प मास’ असेही म्हणतात. महाराष्ट्रामध्ये याला ‘धोंड्याचा महिना’ असे म्हणतात. या महिन्याची देवता विष्णू आहे. ३३ या संख्येने या महिन्यात दान देणे शुभकारक मानतात. महाराष्ट्रामध्ये अधिक मासात कन्येला आणि जावयाला लक्ष्मीनारायणस्वरूप मानून जावयाला ३३ अनारशांचे वाण देतात. अनारसे हा पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. जावयाला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे आणि त्या योगे आपल्या कन्येचेही आयुष्य सुखी असावे, असा यामागील हेतू असू शकतो.
 
 
 
 
अधिक मासात मंगल कार्ये निषिद्ध मानली जातात. परंतु, व्रत, पारायणे, उपवास यासाठी हा महिना शुभ असतो. भागवत ग्रंथाचे अधिक मासात पारायण करण्याची प्रथाही भारतामध्ये आहे. अधिकाधिक पुण्यफल देणारा हा अधिक महिना आपल्याला आपल्या पूर्वजांच्या गणिती आणि वैज्ञानिक दृष्टीचे स्मरण करून देणारा आहे. ‘अधिकस्य अधिकम फलम’ या न्यायाने तो आपणा सर्वांना नव्या संकल्पांसाठी प्रेरणा देवो. 



यावर्षी अधिक मास आश्विन १८ सप्टेंबर रोजी आला आहे. पुढील काही अधिक मास - २०२० : आश्विन
२०२३ : श्रावण, २०२६ : ज्येष्ठ, २०२९ : चैत्र, २०३१ : भाद्रपद, २०३४ : आषाढ, २०३७ : ज्येष्ठ,२०३९ : आश्विन. निरीक्षण केल्यास असे दिसून येईल की, २०२० मध्ये आश्विन अधिक आहे आणि बरोबर १९ वर्षांनी तो पुन्हा अधिक मास म्हणून येणार आहे. अन्य मासांचेही असेच आहे.
अधिक मासाचा आणि ३३ या संख्येचा संबंध
 
एका चांद्रवर्षामध्ये ३६० तिथी असतात. एका सौरवर्षात ३७१ तिथी असतात. म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान असते. दरवर्षीच्या या ११ तिथी झाल्या की, ३३ तिथी अधिक झाल्यावर अधिक महिना येतो. म्हणून ‘तीस-तीन’ (३३) दान देण्याची प्रथा आहे.
अधिक मास कोणते येतात?
 
सूर्याच्या भासमान गतीमुळे ठरावीकच महिने अधिक येतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे महिने अधिक येतात. कार्तिक, मार्गशीर्ष व पौष हे महिने ‘क्षय मास’ होतात. माघ महिना कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.
- - वसुमती करंदीकर (७७९६३८०९४६)
Powered By Sangraha 9.0