इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची आज पायाभरणी

    18-Sep-2020
Total Views |

dr babasaheb ambedkar_1&n



मुंबई :
इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या पायाभरणीचा समारंभ आज होणार आहे. पण या समारंभावरून अनेक जण नाराज आहेत. या कार्यक्रमाला फक्त १६ जण आमंत्रित आहेत. कोरोनामुळे छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे काही मंत्र्यांना तर कार्यक्रमाची माहिती सुद्धा नाही. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण नसल्याने ते नाराज असल्याचे कळते.


आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पार पडणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा राज्यातील पहिलाच सर्वात मोठा सोहळा असणार आहे. शिवाय लॉकडाऊन काळातीलही हा सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित राहणार असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. मात्र यावेळी प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकरा यांना निमंत्रणच नसल्याने महाविकास आघाडी सरकारने आंबेडकरवादी चळवळीला या सोहळ्यापासून दूर ठेवल्याचे अधोरेखित होते. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते.


इंदू मिलमधील स्मारक कसं असेल?


मुंबईतील दादर येथील इंदू मिल परिसरात १२५ एकर जागेवर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याची घोषणा केली. त्यानंतर युतीच्या सरकरने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालायकडून सर्व परवानग्या मिळवल्या. बिहार निवडणुकीआधी ऑक्टोबर २०१५ साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंदू मिल इथे आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या स्मारकाच्या आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल. तसेच लायब्ररी, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, भिक्खू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्किंग, म्युझियम आदींचा या आराखड्यात समावेश आहे.