'मराठा आरक्षणावर निकाल येईपर्यंत राज्यात मेगा भरती नको'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

mega bharati_1  



मुंबई :
राज्यातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मात्र, मराठा आरक्षणावर निकाल येईपर्यंत ही राज्य सरकारने मेगा भरती करू नये अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली. तर 'जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत ही मेगा भरती कशाला?' असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.



दरम्यान, मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टान अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. अंतरिम स्थगिती देत यासंबंधीची याचिका पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग केली. ही स्थगिती देताना न्यायालयाने इंदिरा सहानी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा संदर्भ दिला. या निर्णयामुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण वगळता नोकरी आणि इतर शैक्षणिक आरक्षणाला तूर्तास स्थगिती मिळाली. अशातच राज्य सरकारने मेगा भारतीचे करणार असल्याचे जाहीर केल्याने मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय येईपर्यंत पोलीस भरती करू नका अशी मागणी केली आहे.तसेच सध्याच्या गढूळ वातावरणात पोलीस भरती कशाला असा सवालही त्यांनी सरकारला केला. ते म्हणाले, आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज व्यथित आहे. त्यात सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. ही भरती करणे म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देणारं आहे. मराठा समाजाचे ५८ मोर्चे संपूर्ण बहुजन समाजाने पाठिंबा दिल्याने यशस्वी झाले. मराठा समाज मोठा भाऊ म्हणून बघितले जाते. आज मोठा भाऊ अडचणीत असताना नोकर भरती काढली जाते. आणखी काही काळ थांबावं, जे काही लक्ष केंद्रीत करायचं असेल ते आरक्षण कसं लागू करु शकता याचा विचार करावा. थोड्या दिवसाने भरती करण्यास अडचण काय? पोलिसांवर तणाव आल्यामुळे पोलीस भरती करताय असं म्हणता, पण मास्क घालून पोलीस भरती घेणार कशी? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.



भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारचा खरमरीत समाचार घेतला आहे. त्यांनी लिहिले की, " राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ? आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे", असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@