काश्मीरच्या वाटेवर बंगाल

    दिनांक  17-Sep-2020 21:52:20
|
Hugali _1  H x
 बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लिमांनी जागोजागी कब्जा केल्याने संबंधित परिसरातील हिंदूंनी अन्यत्र पलायन केले. परिणामी, लोकसंख्येचे संतुलन बिघडल्याने बंगालमधील कित्येक जिल्हे मुस्लीमबहुल झाले. कट्टर मुस्लिमांनी वाटेल तेव्हा छोट्या-छोट्या कारणांवरून वा कारणाशिवाय दंगल केल्याचे आढळले. लॉकेट चॅटर्जी यांनी या पार्श्वभूमीवरच बंगाल काश्मीरच्या वाटेवर असल्याचे म्हटले.
 
 
रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकांनद, रवींद्रनाथ टागोर, योगी अरविंद, सुभाषचंद्र बोस आणि कितीतरी महनीय व्यक्तींची जन्मभूमी, सांस्कृतिक, साहित्यिक आणि बौद्धिकदृष्ट्या संपन्नभूमी म्हणून ओळखले जाणारे पश्चिम बंगाल राज्य आज मात्र सांप्रदायिकता आणि तुष्टीकरणाच्या आगीत होरपळताना व हिंदूंचा बळी घेताना दिसते. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी कम्युनिस्टांच्या सत्ताकाळात पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना व हिंदुत्ववाद्यांना दमनकारी, अत्याचारी राजवट पाहावी लागली, तर आताही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या कारभाराखाली इथल्या हिंदूंचे जगणे दुष्करच झाले आहे.
 
भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी नुकतेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना पश्चिम बंगालमधील हिंदूविरोधी व मुस्लिमानुनयी विदारक परिस्थितीचे वास्तव कथन केले. पश्चिम बंगाल संकटात असून राज्याची अवस्था जुन्या काश्मीरसारखी होत असल्याचे त्या दुःखावेगाने म्हणाल्या. नव्वदच्या दशकात काश्मीर खोर्‍यात हिंदूंवर, पंडितांवर इस्लामी कट्टरवाद्यांनी, घुसखोरांनी स्थानिक राजकीय पक्ष व नेत्यांच्या समोरच अनन्वित अत्याचार केले. हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करणे आणि प्रतिकार करणार्‍या हिंदूंची घरेदारे जाळून टाकणे, मंदिरांची तोडफोड करणे, मुली-महिलांवर बलात्कार करत पुरुषांना ठार मारणे आणि संपूर्ण खोरे मुस्लीमबहुल करणे, असले प्रकार धर्मांधांनी ‘जिहाद’च्या, ‘दार-उल-इस्लाम’च्या नावाने केले.
 
धर्मवेडाचा चोळणा पांघरलेल्यांमुळे आणि राज्यव्यवस्थेने साथ न दिल्याने लाखो हिंदूंना काश्मीर खोर्‍यातून, आपल्या मायभूमीतून जीव वाचवण्यासाठी परागंदा व्हावे लागले. आजही लाखो काश्मिरी हिंदू आपल्या मूळस्थानापासून शेकडो मैल अंतरावर आयुष्य कंठत असून दुर्लक्ष केल्यास अशीच वेळ पश्चिम बंगालच्या हिंदूंवरही येईल, असा लॉकेट चॅटर्जी यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे.
लॉकेट चॅटर्जी यांनी आपल्या भाषणात पश्चिम बंगालमधील अनेक हिंदुविरोधी व मुस्लीम लांगुलचालनाच्या घटनांची माहिती दिली. तसेच तृणमूल काँग्रेसचा व पक्षनेत्यांचा या कृत्यांमध्ये सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाची आपत्ती व ‘लॉकडाऊन’मध्येही हिंदुविरोधी कारवायांत खंड पडलेला नसून हुगळी जिल्हा धर्मांधांनी तीन दिवस धुमसत ठेवला. कोरोनाची चाचणी करणार नाही, असे म्हणत इथल्या कट्टर मुस्लिमांनी दंगल केली आणि शहरातील हिंदूंची घरे, दुकाने जाळून टाकली, मंदिरांची तोडफोड केली. हे सर्व होत असताना राज्य सरकारच्या अखत्यारितील पोलीस यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून शांत बसली होती.
 
धर्मवेड्या मुस्लिमांनी हिंसाचार करणे आणि पोलिसांनी त्यावर कारवाई न करणे, हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागील नऊ वर्षांतील सत्तेचाच परिणाम आहे. कारण, ममतांनी सरकार स्थापन केल्यापासून सातत्याने मुस्लीम तुष्टीकरणाचे धोरण अवलंबले. त्यातली ठळक उदाहरणे म्हणजे, पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध आणि पारंपरिक दुर्गापूजा उत्सवावर घातलेले निर्बंध. मोहरममुळे दुर्गामूर्तीची मिरवणूक काढू न देणे, वसंत पंचमीला शाळांतील सरस्वतीपूजनावरील बंधने, रामनवमी साजरी करण्यावर, मिरवणूक काढण्यावर घातलेले निर्बंध, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍यांशी स्वतः मुख्यमंत्र्याने रस्त्यावर उतरून भांडण करणे वगैरे प्रकार राज्यात झाले.
 
हिंदूंचे स्वातंत्र्य हिरावले गेले आणि हिंदूंवरील अन्यायाविरोधात उठलेला आवाज दाबण्याचे कामही ममता सरकारने केले. रा. स्व. संघ, भाजप आणि हिंदुत्ववादी संस्था-संघटनांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. भाजपनेत्यांच्या म्हणण्यानुसार या हत्यांमागे तृणमूल काँग्रेसचा हात होता आणि अजूनही अशा प्रकारचे हत्याकांड इथे होत असल्याचे दिसते. राज्य सरकारने मात्र त्याची दखल घेतल्याचे, त्याविरोधात कारवाई केल्याचे चित्र कधीही पाहायला मिळाले नाही.
 
ममता बॅनर्जींनी स्थानिक मुस्लिमांना जवळ करतानाच बांगलादेशी मुस्लीम आणि रोहिंग्या मुस्लिमांसाठीही पायघड्या अंथरल्या. त्यातूनच राज्याच्या सीमावर्ती भागात हिंदूधर्मीय केवळ अल्पसंख्याकच नाही, तर कित्येक ठिकाणे, परिसर हिंदुविहीन झाल्याचे दिसते. घुसखोर, बांगलादेशी, रोहिंग्या, धर्मांध मुस्लिमांनी जागोजागी कब्जा केल्याने संबंधित परिसरातील हिंदूंनी अन्यत्र पलायन केले. परिणामी, लोकसंख्येचे संतुलन बिघडल्याने पश्चिम बंगालमधील कित्येक जिल्हे मुस्लीमबहुल झाले. केंद्र सरकारकडून घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीपुस्तिकेची घोषणा करण्यात आली, तर त्यालाही ममतांनी आक्षेप घेतला.
 
कारण, आता घुसखोर मुस्लीम तिथले मतदारही झालेले आहेत आणि मतांच्या गठ्ठ्यासाठी ममता बॅनर्जी कोणत्याही समाजघातक, देशविघातक थराला जायला तयार आहेत. मात्र, त्याचेच भयावह परिणाम पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत असून गेल्या काही वर्षांत राज्यातील सीमावर्ती व मुस्लीमबहुल जिल्ह्यात अनेकदा दंगली उसळल्या. मालदा, उत्तर परगणा, मुर्शिदाबाद, आसनसोल, दिनाजपूर वगैरे भागात स्थानिक व घुसखोर अशा दोन्ही बाजूच्या कट्टर मुस्लिमांनी वाट्टेल तेव्हा छोट्या-छोट्या कारणांवरून वा कारणाशिवाय दंगल केल्याचे आढळले.
 
त्या दंगलींचे लक्ष्य अर्थातच हिंदू व्यक्ती, हिंदूंची मालमत्ता, संपत्ती हेच होते-असते. आताच्या ‘लॉकडाऊन’ काळात कट्टर मुस्लिमांनी केलेली दंगलदेखील तसे पाहता निरर्थक कारणावरून म्हणजे कोरोना चाचणीवरून झाली. तेव्हाही हिंदूंवरच हल्ले करण्यात आले आणि लॉकेट चॅटर्जी व अन्य भाजपनेते दंगलस्थळी जाण्यासाठी निघाले, तर त्यांनाही ममता बॅनर्जी सरकारने रोखले. लॉकेट चॅटर्जी यांनी या पार्श्वभूमीवरच बंगाल काश्मीरच्या वाटेवर असल्याचे म्हटले.
 
तथापि, काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार घडला, त्यावेळी कोणतेही सरकार त्यांच्या पाठीशी नव्हते. तसेच तथाकथित मानवाधिकारवादी वा धर्मनिरपेक्षतावादी लोकही चिडीचूपच होते. ते आताही हिंदुविरोधी कारवायांत तोंडाला कुलूप लावूनच बसलेले आहेत. मात्र, केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असून बंगालला काश्मीर होण्यापासून रोखण्याची जबाबदारी त्याचीही आहेच. राज्यातील हिंदूदेखील भाजपच्या मागे ठामपणे उभा राहत असून गेल्या लोकसभा निवडणुकीत त्याची झलकही पाहायला मिळाली, तर आगामी वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेव्हा बंगाली मतदाराने मुस्लिमांचा अनुनय करणार्‍यांऐवजी राज्याची ओळख, संस्कृती, वारसा जपणार्‍या, घुसखोरविरोधी उमेदवारांची, पक्षाची बाजू घेतली, तर मात्र बंगालचा काश्मीर होणे, नक्कीच थांबू शकते.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.