कोरोना सोडून कंगनाच्या मागे लागल्याने महाराष्ट्राची दुरवस्था! : अतुल भातखळकर

17 Sep 2020 15:53:57
Atul bhatkhalkar_1 &


ऑगस्ट महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ!


मुंबई : ऑगस्ट महिन्यात मुंबईत कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता, गणेशोत्वसाठी दिलेली सूट, मास्क न बांधणे किंवा सुरक्षित अंतर न राखणे. यामुळे मुंबईत पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व मुद्दयांवरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.


मुंबईतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून रुग्णवाढीचा वेग चिंताजनक झाला आहे. राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने वारंवार नियमात केलेले बदल, अंमलबजावणीतील शिथिलता, रुग्ण संख्या लपवण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आणि घरी बसून चालवलेला कारभार याचा हा परिणाम असून, कंगनाच्या मागे लागण्यापेक्षा कोरोनाच्या मागे राज्य सरकार लागले असते तर आज महाराष्ट्रावर ही दुरावस्था ओढवली नसती, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.


ऑगस्टमध्ये ओसरू लागलेला करोनाचा संसर्ग मुंबईत पुन्हा वाढू लागला आहे. शहरात दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि आढळलेले बाधित रुग्ण याचे प्रमाण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढले. ऑगस्टमध्ये मुंबईत प्रतिदिन रुग्णसंख्या सर्वसाधारणपणे एक हजार किंवा त्याहून कमी नोंदली जात होती.


ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दर दिवशी सुमारे सात ते नऊ हजार चाचण्या होत होत्या आणि बाधितांचे प्रमाण सुमारे १० ते १२ टक्के होते. पुढील आठवडय़ात हे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चाचण्यांची संख्या आठ ते नऊ हजार झाली आणि बाधितांचे प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पालिकेने दर दिवशी चाचण्यांची संख्या सुमारे १५ हजारांवर नेली. त्या तुलनेत दर दिवशीची रुग्णसंख्याही जवळपास अडीच हजारांहूनही अधिक नोंदली गेली. दर दिवशी चाचण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक केल्याने रुग्णसंख्या वाढल्याचा दावा पालिकेने केला तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांवर गेल्याचे आकडेवारीतून दिसून येते, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे.




Powered By Sangraha 9.0