खासगी रुग्णालयातील डॉक्टर आता जम्बो कोविड सेंटरमध्ये 'ऑन ड्युटी'!

17 Sep 2020 19:59:19
Covid centre_1  

दूरध्‍वनीद्वारे देणार सल्ला; गरजेनुसार भेटी


मुंबई : जुलै-ऑगस्टमध्ये घटलेली कोविड रुग्णसंख्या त्याच जोमाने वाढू लागताच पालिकेच्या आरोग्य खात्याची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे आता ११ खासगी रुग्णालयातील ३५ डॉक्टरांचा ताफा आता पालिकेच्या जम्बो कोविड केंद्रांना सेवा देणार आहे. मात्र दूरध्वनीवरून सल्ल्याद्वारे या सेवा असतील. प्रसंगी गरजेनुसार कोविड केंद्रांना भेटी देण्यात येणार आहेत.


कोविड बाधितांना अधिकाधिक प्रभावी उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी ‘जम्‍बो कोविड केंद्र सुरु केले आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने भायखळा, एनएससीआय-वरळी, बीकेसी, नेस्‍को-गोरेगाव, मुलुंड आणि दहिसर परिसरांचा समावेश आहे. या ठिकाणी सुमारे ७ हजार ६५० रुग्‍णशैय्या उपलब्‍ध आहेत. तसेच या ठिकाणी साधारणपणे १ हजार ४६६ वैद्यकीय कर्मचारीही अव्‍याहतपणे कार्यरत आहेत. यामध्‍ये महापालिकेच्‍या केईएम, नायर, शीव आदी प्रमुख रुग्‍णालयांमधील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय इत्‍यादींचा समावेश आहे. महापालिकेच्‍या या उपचार केंद्रांमध्‍ये दाखल असलेल्‍या रुग्णांना अधिक प्रभावी वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी ११ खासगी रुग्‍णांलयामध्‍ये कार्यरत असणारी ३५ तज्‍ज्ञ डॉक्‍टर मंडळी आता आपल्‍या सेवा दूरध्‍वनीद्वारे महापालिकेच्‍या जम्‍बो कोविड केंद्रांना देखील उपलब्‍ध करुन देणार आहेत. तसेच ते आवश्‍यकतेनुसार या उपचार केंद्रांना भेट देऊन तेथील डॉक्‍टरांशी वैद्यकीय उपचारांच्‍या अनुषंगाने सल्‍ला मसलत देखील करणार आहेत. या केंद्रामध्‍ये गरजेनुसार वैद्यकीय कर्मचा-यांची संख्‍या वाढवण्‍याची तरतूदही करण्‍यात आली आहे.


या उपचार केंद्रांमध्‍ये १५ सप्‍टेंबरपर्यंत २० हजार ७२२ कोविड बाधित रुग्‍णांवर उपचार करण्‍यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.


'ई’ विभागातील जम्‍बो कोविड सेंटरमध्‍ये जसलोक व भाटिया रुग्‍णालयातील ५ डॉक्‍टर नियुक्त करण्यात आले आहेत.

'जी दक्षिण’ विभागातील एन.एस.सी.आय जम्‍बो कोविड सेंटर मध्‍ये बॉम्‍बे व ब्रिच कॅन्‍डी रुग्‍णालयातील ८ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'एच पूर्व’ विभागातील बीकेसी जम्‍बो कोविड सेंटर मध्‍ये लिलावती व हिंदुजा रुग्‍णालयातील ७ डॉक्‍टर नियुक्त करण्यात आले आहेत.

'पी दक्षिण’ विभागातील नेस्को जम्‍बो कोविड सेंटरमध्‍ये नानावटी व अंबानी रुग्‍णालयातील ६ डॉक्‍टर नियुक्त करण्यात आले आहेत.

'टी’ विभागातील मुलुंडच्या जम्‍बो कोविड सेंटर मध्‍ये फोर्टीस रुग्‍णालयातील डॉक्‍टर, तर ‘आर उत्‍तर’ विभागातील दहिसर जम्‍बो कोविड सेंटर मध्‍ये बॉम्‍बे व सुराणा रुग्‍णालयातील ८ डॉक्‍टर सेवेत दाखल होणार आहेत.




Powered By Sangraha 9.0